स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया (सिमी) या अतिरेकी संघटनेच्या आठ दहशतखोर कैद्यांनी भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन करावे ही बाब त्या कारागृहाच्या गैरव्यवस्थेवर जशी प्रकाश टाकणारी तसेच त्यांचे नंतरच्या काही तासांतच पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले जाणे अनेकांचा संशय जागवणारी आहे. सिमी ही देशाची शत्रू संघटना आहे. त्यांच्यातील अनेकांच्या डोक्यांवर लाखो रुपयांची बक्षिसे सरकारने जाहीर केली आहेत. याच अतिरेक्यांपैकी हे आठ जण भोपाळच्या कारागृहात जेरबंद होते. त्यांच्यासाठी त्या कारागृहात अर्थातच विशेष सुरक्षा व्यवस्था केली गेली असणार. त्या व्यवस्थेला छेद देत हे अतिरेकी तुरुंगातील हेडकॉन्स्टेबलचा गळा कापून खून करतात आणि कारागृहातील बेडशीट््सच्या साहाय्याने तुरुंगाची भिंत ओलांडून स्वत:ची सुटका करून घेतात ही बाब त्यांना बाहेरून वा आतून मिळालेल्या मदतीवाचून शक्य होणारी नाही. आपण बाहेर पडताच आपल्याला लांबवर नेणारी यंत्रणा बाहेर तयार असेल याची खात्री करून घेतल्याखेरीज हे दहशतवादी असे साहसी कृत्य करायला धजावले नसते. काही काळापूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी आपल्याजवळ दडविलेले १०० हून अधिक मोबाईल फोन्स तुरुंगाधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती साऱ्यांना आहे. या फोन्सच्या आधारे हे कैदी त्यांच्या बाहेरच्या साथीदारांशी सतत संपर्कात होते हेही त्याचवेळी उघड झाले आहे. भोपाळच्या कारागृहाची स्थिती याहून वेगळी नसणार. या कैद्यांचा त्यांच्या बाहेरच्या साथीदारांशी संपर्क असल्यावाचून त्यांच्या डोक्यात या पलायनाची योजना व आखणी झाली नसणार. त्याहून गंभीर बाब ही की या आठ जणांच्या पलायनाची काही खबरबात तुरुंगातील इतर कैद्यांनाही असणार. या प्रकरणाची यापुढे चौकशी होईल. ही चौकशी सुरू होण्याआधीच भोपाळच्या कारागृह अधीक्षकासह तेथील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मध्य प्रदेश सरकारने निलंबितही केले आहे. तुरुंगफोडीची एवढी मोठी घटना आणि तिचा संबंध असलेले देशाचे दहशतखोर शत्रू यांचा विचार करता कारागृहातील प्रशासनाधिकाऱ्यांपैकी काहींच्या मदतीवाचूनही हे पलायन झाले नसणार. तुरुंगातून साधे कैदी पळून जाणे वेगळे आणि देशाच्या जीवावर उठलेले लोक एवढ्या मोठ्या संख्येने तुरुंगाबाहेर जाऊ शकणे पूर्णत: वेगळे. मुळात या साऱ्या प्रकरणाविषयीच्या संशयाचा आरंभ येथेच होतो. ही माणसे तुरुंगाबाहेर गेल्यानंतर पोलिसात खळबळ उडते आणि पोलिसांचे ताफे त्यांच्या मागावर जाऊन भोपाळलगत असलेल्या इटखेडी भागातील अचारपुरा येथे त्या आठ जणांना घेरतात ही बाबही या संशयात भर घालणारी आहे. ज्याला एन्काऊंटर म्हणतात तो प्रकार काहीसा असा असतो. ज्यांना मारायचे त्यांना पकडून वा संधी देऊन तुरुंगाबाहेर जाऊ द्यायचे आणि नंतर त्यांना घेरून ठार करायचे हा आपला पराक्रम दाखविण्याचा पोलिसांचा खाक्या आता सर्वपरिचित आहे. मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत झालेले असे एन्काऊंटर्स आपल्याही स्मरणात आहेत. देशाचे शत्रू मारले गेले तर त्याचे दु:ख कोणी करण्याचे कारण नाही. मात्र त्यांच्या अशा एन्काऊंटरच्या बळावर आपल्या पराक्रमाची कोणी टिमकी वाजविण्याचेही कारण नाही. अतिरेक्यांचे वर्ग वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवायचे, त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी तेवढाच काळ नुसती पायपीट करायची आणि त्या काळात त्यांच्या तब्येती चांगल्या राहतील याचीही व्यवस्था करायची, हे पोलीस आणि तुरुंग खाते यांच्या वाट्याला आलेले अत्यंत दुर्दैवी आणि जिकिरीचे काम आहे. ते करीत राहण्यापेक्षा ज्यांचे शत्रुत्व उघड आहे त्यांना सरळसरळ निकालात काढणे सरकारला जमणारे व जनतेलाही आवडणारे आहे. मात्र या व्यवहाराचा गैरवापर करणारी माणसे सरकारातही बसली असतात याबाबतही साऱ्यांनी सावध असणे गरजेचे आहे. जगभरात उभ्या राहिलेल्या मानवतावादी संघटना सरकारने ज्यांच्यावर गुन्हा शाबीत झाला नाही त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत. स्वत:ला अतिरेकी देशभक्त म्हणवणारे लोक या संघटनांची खिल्ली उडवताना दिसत असले तरी त्यांच्यामुळे पोलीस यंत्रणांवर कायदा आणि मानवाधिकार यांची बंधने येतात व ती लोकशाहीसाठी आवश्यकही असतात. ज्या आठ जणांना भोपाळच्या पोलिसांनी कंठस्नान घातले त्यांच्याबाबत असे बोलले जात असेल तर तोही प्रकार फार गंभीरपणे समजून घ्यावा असा आहे. कैद्यांना शासन करण्याचा अधिकार देशातील न्यायालयांना आहे. तो पोलिसांना नाही. एन्काऊंटर हा प्रकार पोलिसांनीच न्यायाधीश होण्याचा आहे. भोपाळ प्रकरणात असे काही झाले नसावे हीच साऱ्यांची धारणा व भावना आहे. मात्र शत्रू असला तरी त्याला त्याची बाजू मांडण्याचा व न्याय मागण्याचा जो हक्क लोकशाही देते त्याचा आदर सगळ्याच घटनात्मक सरकारांनी करणे गरजेचे आहे. सबब, भोपाळच्या या घटनेची सखोल व तपशीलवार चौकशी होणे आणि तिच्यातून सत्य जनतेपर्यंत येणे आवश्यक आहे. आपली लोकशाही शत्रूंचे वार सहन करण्याएवढी समर्थ आहे, मात्र तिच्यावर आतून हल्ला होणे ही बाब जास्तीची काळजी करायला लावणारी आहे.
भोपाळ : सखोल चौकशी आवश्यक
By admin | Updated: November 2, 2016 05:45 IST