शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बापूंना पूजनीय मानता, मग त्यांचे अनुकरण का करत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 01:07 IST

हिंदुस्तानच्या इतिहासात १६ एप्रिल या तारखेचे विशेष महत्त्व आहे.

विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

हिंदुस्तानच्या इतिहासात १६ एप्रिल या तारखेचे विशेष महत्त्व आहे. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १६ एप्रिल १९१७ रोजी महात्मा गांधींनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या जुलुमाच्या विरोधात बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रहाचे पहिले बीज रोवले होते. त्या दिवशी महात्माजी मोतिहारी शहरातून जसवलपट्टी गावाकडे रवाना होण्याच्या बेतात असतानाच चंपारण्यच्या इंग्रज जिल्हाधिकाऱ्याने त्यांना जिल्हा सोडून जाण्याचे फर्मान काढले. गांधींच्या उपस्थितीने जिल्ह्यात अशांतता निर्माण होऊ शकते, असे त्यासाठी कारण दिले गेले. बापूंनी हा आदेश धुडकावून लावल्यावर त्यांना अटक केली गेली.दुसऱ्या दिवशी न्यायालयात उभे केल्यावर न्यायाधीशाने मोहनदास करमचंद गांधींना ‘तुमचा वकील कोण आहे?’ असे विचारल्यावर गांधींनी ‘कोणी नाही’ असे उत्तर दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीला मी उत्तर पाठविले आहे, असे गांधींजींनी सांगितल्यावर न्यायाधीश म्हणाले की, तुमचे उत्तर अद्याप न्यायालयात पोहोचलेले नाही. यावर गांधीजींनी आपल्याकडील एक कागद काढला व तो वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, ‘माझ्याच देशात कुठेही येण्या-जाण्यावर आणि काम करण्याच्या स्वातंत्र्यावर घातलेले निर्बंध मला मान्य नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश न पाळण्याचा गुन्हा मला कबूल आहे व त्यासाठी मला शिक्षा द्यावी, अशी मागणी आहे.’ गांधीजींचा हा पवित्रा पाहून न्यायाधीश हैराण झाले. न्यायाधीशांनी ‘जामीन घ्या’ असे सुचविल्यावर गांधीजींनी ‘जामिनासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’, असे उत्तर दिले. यावर, जिल्हा सोडून निघून जाण्याचे आणि पुन्हा न येण्याचे वचन देत असाल तर खटला बंद केला जाऊ शकेल, असेही न्यायाधीशांनी सांगून पाहिले. पण त्यावर बापू उत्तरले, असे कसे बरं होईल. तुम्ही मला तुरुंगात टाकलेत की शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर मी येथे चंपारण्यमध्येच कायमचे घर करून राहायला मोकळा होईन! तेवढ्यात, ‘या माणसाच्या बोलण्यात अडकू नका’ असा निरोप न्यायाधीशांना दिल्लीहून आला.खरे तर गांधीजी पूर्ण विचार करूनच चंपारण्यमध्ये आले होते. १९१६ च्या काँग्रेस अधिवेशनात राजकुमार शुक्ला नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याने इंग्रज सरकार निळीची शेती करण्याची जबरदस्ती करीत असल्याची तक्रार केली होती. त्या काळात कृत्रिम नीळ तयार करण्याचे तंत्र गवसलेले नव्हते त्यामुळे नैसर्गिक नीळच वापरली जायची. युरोपची मागणी भागविण्यासाठी इंग्रज सरकार शेतकऱ्यांवर निळीची लागवड करण्याची सक्ती करत होते. निळीची शेती केल्याने शेतकऱ्याच्या जमिनीही नापीक होऊ लागल्या होत्या. याखेरीज शेतकऱ्यांकडून ४६ प्रकारचे कर सक्तीने वसूल केले जात असत. गांधीजींनी येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे त्या राजकुमार शुल्क नावाच्या शेतकऱ्याचे म्हणणे होते. गांधीजींनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधी अभ्यास केला. नीळ हे नगदी पीक असल्याने आंदोलन केल्यास शेतकरी आपल्याला साथ द्यायला तयार होतील, असे त्यांना वाटले. त्यांनी केलेले परिस्थितीचे आकलन खरे ठरले. न्यायालयात दाखविलेल्या बाणेदारपणामुळे गांधीजींची कीर्ती त्या संपूर्ण प्रदेशात पसरली. बिहारचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर एडवर्ड गेट यांनी गांधीजींना चर्चेसाठी बोलावले व त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘चंपारण अ‍ॅग्रेरियन कमिटी’ स्थापन केली गेली. सरकारने गांधीजींनाही या समितीवर नेमले. समितीच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांवरील कर कमी झाले व त्यांना भरपाई म्हणून रक्कमही मिळाली. शेतकऱ्यांंच्या समस्या सोडविण्यासाठी गांधीजींनी घेतलेला हा पुढाकार पुढे इंग्रजी शासन उखडून टाकण्याचे कारण ठरेल, याचा त्यावेळी कोणाला अंदाजही आला नसेल. गांधीजींनी येथे केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग नंतर अधिक व्यापक प्रमाणावर वापरला व स्वातंत्र्यलढ्याचे ते प्रमुख अस्त्र झाले. त्यांच्या एका हाकेसरशी लाखो लोक तुरुंगात जायला तयार झाले. त्यावेळी गांधीजींच्या हाकेला ओ देऊन तुरुंगात गेलेल्यांमध्ये माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा हेही होते, ही माझ्यासाठी विशेष गौरवाची गोष्ट आहे.मी माझ्या वडिलांकडून (बाबूजींकडून) गांधीजींचे अनेक किस्से ऐकले आहेत. आज देश गांधीजींचे नाव घेतो पण त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण मात्र करत नाही. या देशाचे भाग्य बदलायचे असेल तर शेतकऱ्यांपासूनच सुरुवात करावी लागेल, हे गांधीजींनी बरोबर जाणले होते. म्हणूनच त्यांनी चंपारण्यमध्ये शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला होता. आज देशातील शेतकऱ्यांची हालत काय आहे? दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्त्या करतात. कारण काय तर शेतीसाठी घेतलेले कर्र्ज फेडून शिवाय दोन वेळची पोटाची खळगी भरता येईल एवढे उत्पन्न त्याला शेतीतून मिळत नाही. मुलांना शिक्षण देणे व जरा शानशोकीचे आयुष्य जगण्याचे स्वप्न तर दूरच राहिले. मला वाटते की, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबवून त्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर गांधीजी आणि त्यांचा चंपारण्य सत्याग्रह आपल्याला नवी दिशा दाखवू शकेल. पण त्यासाठी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याची दिशा शोधण्याचे आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. वस्तुस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची ना सरकारला चिंता ना जनतेला काळजी आहे. मला हे पाहून दु:ख होते की, सर्वच राजकीय पक्ष गांधीजींचा उदोउदो करतात, लोकसभा व राज्यसभेत त्यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होतात, पण त्यांनी दाखविलेली दिशा मात्र ते विसरून जातात. बापूंनी दाखविलेला धर्मनिरपेक्षतेचा रस्ताही असाच अंधारात हरवल्यासारखा झाला आहे. चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्तीनिमित्त आपण बापूंनी दाखवलेल्या वाटेने मार्गक्रमण करण्याचा संकल्प सोडणार का?हे लिखाण संपविण्यापूर्वी...आॅस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ या जगातील सर्वात मोठ्या प्रवाळ भिंतीच्या दोन तृतियांश भागाची हानी झाली आहे, ही फारच चिंताजनक बातमी आहे. वैज्ञानिकांनी ही वाईट बातमी देण्याआधी या रीफची लांबी सुमारे २,३०० किमी होती. या रीफचा बहुतांश भाग पाण्याखाली आहे व काही बाहेर दिसतो. वैज्ञानिक म्हणतात की, हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून ग्रेट बॅरियर रीफ वाचण्याची शक्यता फारच कमी आहे व सन २०५० पर्यंत ही रीफ पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. निसर्गाने दिलेल्या या बहुमोल देणग्यांची आपण जराही कदर करत नाही. सर्व जीवजंतू निसर्गनियमानुसार वागतात. मग एकटा मानवच सृष्टीची अशी का नासाडी करीत आहे?

(vijaydarda@lokmat.com)