शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

लेख: प्लॅस्टिकच्या जाळ्यातली पृथ्वी कधी सुटणार? सक्रियपणे लढा उभारण्याची हीच वेळ

By विजय बाविस्कर | Updated: June 5, 2025 11:23 IST

प्लॅस्टिक नावाची ‘सोय’ आता आपल्या जिवावर उठली आहे.

विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत

प्लॅस्टिकच्या विषारी विळख्यात आज पृथ्वी तडफडते आहे. भारत जगातील प्रमुख प्लॅस्टिक प्रदूषक देशांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे ९.४६ दशलक्ष टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. नद्या, समुद्र, जमीन आणि हवा सर्वत्र प्लॅस्टिकचा कहर झाला आहे. प्लॅस्टिक नाही, असे ठिकाण शोधूनही सापडणार नाही. हे प्लॅस्टिक केवळ वन्यजीवांचे नव्हे तर मानवी आरोग्याचेही मुळापासून नुकसान करते. मातीची सुपीकता, पाण्याची शुद्धता आणि जीवसृष्टीची समृद्धी यावर घातक परिणाम करते. आज साजरा होणारा पर्यावरण दिन फक्त औपचारिकता न राहता, प्रत्येकाने सक्रियपणे प्लॅस्टिकविरोधी लढा उभारण्याची हीच वेळ आहे. 

‘प्लॅस्टिक’ या नावातच सुविधा दिसते; पण परिणामात पर्यावरणाचा संहार आणि माणसाच्या आरोग्याला धोका आहे. वन्यजीव, माणूस आणि पर्यावरण यांचा जणू संथ मृत्यू चालू आहे. आजच्या आधुनिक जगात प्लॅस्टिकशिवाय जीवन अशक्य वाटते. घराघरात, दुकानात, रस्त्यावर, ऑफिसमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचाच सुळसुळाट आहे. जगभरात १९५० पासून आजवर सुमारे ९.२ अब्ज टन प्लॅस्टिक तयार झाले असून, त्यातील ७ अब्ज टन प्लॅस्टिक कचऱ्यात रूपांतरित झाले आहे. हा कचरा तलाव, नद्या, समुद्र, माती सर्वत्र विखुरलेला आहे. प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. दरवर्षी ४३० दशलक्ष टन प्लॅस्टिक तयार होते आणि त्यातील दोनतृतीयांश कचऱ्यात जाते ! आपली हीच ‘सोय’ आता आपल्या जिवावर उठली आहे. प्लॅस्टिकचा कचरा नद्यांमध्ये, समुद्रात, जमिनीत मिसळतो. तब्बल ८००हून अधिक प्रजातींना प्लॅस्टिकमुळे धोका निर्माण झाला आहे. मासे, कासवे, पक्षी हे प्लॅस्टिक गिळून मरतात. शेतजमीन नापीक होते. पाण्याचा निचरा थांबतो. पूर येतात.  मुंबई, पुण्यासारखी महानगरे वारंवार तुंबण्यामागे प्लॅस्टिकचा मोठा हात आहे. प्लॅस्टिकच्या कृपेने इतर शहरांतही ही समस्या वाढू लागली आहे.

प्लॅस्टिकमधील विषारी रसायने, मायक्रोप्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरात श्वास, पाणी, अन्न, त्वचा यांच्या माध्यमातून प्रवेश करतात. ही रसायने हार्मोनमध्ये बदल घडवतात. प्रजननशक्ती कमी करतात. त्यातून असंख्य आजार निर्माण होतात. गर्भवती महिलांपासून लहान मुलांपर्यंत, वृद्धांपासून तरुणांपर्यंत कोणीही या घातक परिणामांपासून सुटलेला नाही. एका संशोधनानुसार, दर आठवड्याला आपण सरासरी ५ ग्रॅम प्लॅस्टिक खातो - म्हणजे एका क्रेडिट कार्डाएवढे ! विचार करा, महिन्याला-वर्षाला आपल्या पोटात किती प्लॅस्टिक जात असेल? 

प्लॅस्टिकच्या डब्यात आपण गरम अन्न भरतो. प्लॅस्टिकच्या डब्यातूनच ते कार्यालयात, शाळा-महाविद्यालयांत नेतो. पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, पॅकेजिंग हे सगळे प्लॅस्टिकचेच ! अशा माध्यमातून प्लॅस्टिक आपल्यात शिरते. प्लॅस्टिकमधील फॅलेट्स, बीपीए, कॅडमियम, पारा, सीसा हे सर्व घटक शरीरातील हार्मोन्स, चयापचय, मेंदू, प्रजनन क्षमता, प्रतिकारशक्ती यावर थेट घातक परिणाम करतात.

महाराष्ट्रात २०१८ पासून एकल वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. केंद्र सरकारनेही २०२२ पासून देशभरात बंदी लागू केली; पण प्रत्यक्षात काय? बाजारात अजूनही प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोलच्या प्लेट्स खुलेआम मिळतात. प्रशासन, पोलिस, नागरिक सगळ्यांची ‘आम्ही काय करायचं?’ अशीच मानसिकता ! कायद्याची अंमलबजावणी जवळपास शून्य. दंडाचा धाक कोणालाच नाही. नागरिकांमध्येही पुरेशी जागरूकता नाही. अशा स्थितीत प्लॅस्टिकच्या या संकटाला रोखणार कोण? 

‘एवढ्या मोठ्या जगात मी एकट्याने काय फरक घडवणार?’ ही मानसिकता प्रत्येकाने आधी सोडायला हवी. बदलाची सुरुवात स्वतःपासून, तातडीने, म्हणजे पर्यावरणदिनीच करायला हवी. सर्वात आधी प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा. कापडी पिशव्या, काचेच्या बाटल्या, स्टीलचे डबे वापरणे सुरू करायचे.

शासनानेही ठोस भूमिका घ्यायला हवी. प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई, अशी दुकाने ‘सील’ करणे याला वेग हवा. नागरिकांनी प्लॅस्टिक घेतल्यास त्यांनाही दंड केला जावा. शाळा, महाविद्यालये, संस्था या ठिकाणी प्लॅस्टिक विरोधी मोहिमा,  रिसायकलिंग उद्योगाला प्रोत्साहन, घराघरात कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि रिसायकलिंग अनिवार्य करणे असे मार्ग चोखाळायला हवे. प्लॅस्टिकमुक्ती हा अस्तित्वाचा लढा आहे. आज आपण बदल घडवला नाही, तर उद्या शुद्ध पाणी, हवा, अन्न, आरोग्य हे सर्व फक्त स्वप्न ठरेल. ‘प्लॅस्टिकमुक्त भारत’ ही घोषणा नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला, या पर्यावरणदिनी संकल्प करूया... ‘प्लॅस्टिकचा वापर थांबवू, आरोग्याचा शत्रू दूर करू आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ, निरामय  सुरक्षित भारत घडवू!

vijay.baviskar@lokmat.com

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी