शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवाने ज्यांचा जीव वाचू शकणार नाही, त्यांना निदान सन्मानपूर्वक निरोप तरी मिळू द्या!

By विजय दर्डा | Updated: May 17, 2021 09:17 IST

गंगेच्या प्रवाहात वाहून आलेली, किनाऱ्यावरच्या वाळूत पुरलेली बेवारस प्रेते आणि गोव्यात तडफडून गेलेले जीव, हे देशावरचे मोठे लांच्छन आहे!

विजय दर्डा 

कितना है बदनसीब जफर दफ्न के लिये दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार मे...

रंगूनच्या कारागृहात कैद असताना भारताचे अखेरचे मुगल बादशाह बहादूर शाह जफर यांनी ही गझल लिहिली होती. एखाद्याला आपल्याच भूमीवर मातीत मिसळण्यासाठीही जागा मिळू नये, यापरते दुर्भाग्य ते कोणते? जिवाला अत्यंत क्लेश देणारी भावना बहादूर शाह जाफर यांनी या गझलेत शब्दबद्ध केली आहे. हल्ली आजूबाजूचे वातावरण, कानावर येणाऱ्या बातम्या, नजरेला क्लेश देणारी छायाचित्रे पाहाताना मला  सतत ही गझल आठवत असते, आणि अत्यंत समर्पक वाटते. मानवाला जन्म आणि मृत्यू हे दोन्ही सन्मानानेच मिळाले पाहिजेत. लोकशाहीची पहिली अट तर हीच नाही का. या जगात सन्मानाने येण्यासाठी आणि त्याचा निरोपही सन्मानानेच घेता यावा यासाठी  एखादी व्यक्ती काही  कोणी तालेवार असण्याची गरज नाही. या मूलभूत सन्मानाचा गरिबी किंवा श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. कोणाला राख होऊन मातीत मिसळायचेय तर कोणाला पंचमहाभूतात विलीन व्हायचेय, या जगात येतानाच्या पहिल्या क्षणी आणि जगाचा निरोप घेतानाच्या अखेरच्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीला  सन्मान हा मिळालाच पाहिजे. राजा असो वा रंक; दोन्ही अखेरीस एकाच  ठिकाणी जाणार असतात.

...तरीही सतत कानावर आदळणाऱ्या, हृदयाची शकले करणाऱ्या या बातम्यांचे काय करायचे? शेकडो मृतदेह गंगेत सोडून देण्यात आले, शेकडो वाळूत पुरण्यात आले हे वाचून हलले नसेल ते काळीज तरी कसले? या बातम्यांचे सारे तपशील वाचताना आणि ती छायाचित्रे पाहाताना माझी नजर सतत पाणावते आहे आणि हृदय गलबलते. अस्वस्थ झालेल्या माझ्या मनाला मीच विचारतो, माझ्या देशात हे काय चालले आहे? हे असे काही माझ्या देशात, सामर्थ्यवान बनून विश्वगुरु होण्याच्या दिशेने निघालेल्या भारतात हे घडावे? खरे तर भारताचे शक्तिमान होणे आणि चीन-रशियाचे बाहू सामर्थ्याने फुरफुरणे; यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. लोकसत्ताक भारत शक्तिमान होणे म्हणजे या देशातली प्रत्येक व्यक्ती शक्तिशाली होणे! मानवी जीवनात अखेरीस दोनच गोष्टी महत्त्वाच्या  असतात : मानसन्मान आणि प्रतिष्ठा! लहान मूल असो वा मोठा माणूस, उचित असा मानसन्मान प्रत्येकालाच मिळाला पाहिजे. व्यक्तीच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरसुद्धा घरीदारी तिला उचित तो सन्मान दिला गेलाच पाहिजे. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा म्हणत, ‘देश मानसन्मान देतो, भेदभाव करत नाही.’

एकदा मी शाळेतून रडत घरी आलो तर बाबूजींनी विचारले, ‘तू का रडतोयस?’  वर्गात माझा अपमान झाल्याचे मी त्यांना सांगितले. शिकवणाऱ्या गुरुजींनीच मला जातिवाचक संबोधून अपमानित केले होते. मारवाडी जैन परिवारात मी जन्माला आलो यात माझा काय दोष? बाबूजी त्यावर म्हणाले,  ‘विजय, तुझ्या डोळ्यात जे अश्रू आले आहेत ना, त्यांचा मी सन्मान करतो कारण प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे...’

...आणि घटनेनेच मला तो दिला आहे.स्वातंत्र्याची लढाईही आपण आत्मसन्मानासाठीच तर लढलो. एरव्ही दोन वेळची भाकरी तर आपल्याला कशीही मिळाली असतीच की !आज माझ्या देशात माणसाच्या या सन्मानाचे रक्षण होत नाही, याचे मला अत्यंत क्लेश होतात. कुणाही विचारी माणसाची आज हीच भावना असेल, हे मला माहिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या देशाचे कंबरडे पार मोडले असून, नागरिक मूलभूत सन्मानाला पारखे होऊन बसले आहेत. अनेक दुर्दैवी नागरिकांना जिवंतपणी औषधे मिळाली नाहीत, इंजेक्शन मिळाली नाहीत, प्राणवायू तर मिळाला नाहीच; पण त्यांना  जिवंतपणी आणि मृत्यूनंतरसुद्धा उचित मानसन्मानही मिळाला नाही. गरिबी हा शाप आहे हे मी जाणतो; पण म्हणून या गरिबाला सन्मानाने वागवले जाऊ नये, असे नव्हे! प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या आप्तांचा अंत्यसंस्कार करतो. हिंदू परंपरेप्रमाणे मृतदेह अग्नीच्या हवाली केला जातो. मुसलमान फतेहा वाचतात, ख्रिश्चन ‘ऑन द नेम ऑफ गॉड’ बायबलमधल्या पंक्ती वाचून मृतदेह जमिनीच्या हवाली करतात.

आज आपल्या देशात मृतदेह पुरण्यासाठी जागा नाही आणि अग्निदाह करावा म्हटले तर लाकडे मिळत नाहीत, कारण लाकडाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत! अंत्यसंस्काराचे विधी परवडत नाहीत, म्हणून उत्तर भारतातील अनेक खेड्यामधील लोक मृतांची शरीरे नदीत सोडून देत आहेत किंवा नदी-किनारी रेतीत पुरत आहेत, हे किती दुर्दैवी आहे. कब्रस्तानात जागा उरलेली नाही असे नाझींच्या राजवटीत घडल्याचे मी ऐकून होतो; पण आज मी लोकशाहीत राहातो आहे, आणि तिथेही तेच  ऐकतो आहे.

भारत ही भविष्यातली महाशक्ती होणार असल्याच्या चर्चा अलीकडेपर्यंत मी ऐकत होतो, त्यावर माझा विश्वासही होता, अजूनही आहे; पण अशा या देशात आज हे काय चालले आहे? अमेरिकी दूतावासासमोर व्हिसासाठी रांगा पाहतो तेव्हा नेहमी माझ्या मनात येते की, ही परिस्थिती लवकरच बदलेल. बदलायला हवी. भारताची ताकद वाढेल आणि एक दिवस भारतीय दूतावासासमोर अमेरिकन लोक व्हिसासाठी अशीच रांग लावतील. या विचारांनी अंगावर अभिमानाचे रोमांच फुलतात हे खरे;  पण आजचे क्लेशदायी वर्तमान मात्र मला निराशा करते. रागही आणते. 

मी काही लिहितो तेव्हा माझ्या डोळ्यांवर कुठल्या पक्षाचा चष्मा नसतो. केवळ आणि केवळ मानवता, आत्मसन्मान, जगण्याच्या अधिकारासाठीची तडफड हीच माझ्या विचारांमागची, लेखनामागची मूलभूत मूल्ये असतात.  कोविडच्या पहिल्या लाटेत आपण स्थलांतरित मजुरांना भुकेने तडफडून मरताना पाहिले. त्यांच्या लहान मुलांचे मृत्यू हृदय हेलावणारे होते. आता गोव्यात पाच दिवसांत शंभरावर लोकांचा मृत्यू प्राणवायूअभावी झाला.  प्राणवायूअभावी दिल्लीत लोक गेले, हे आपण महामारीच्या प्रारंभी ऐकत होतो. मग पालघर, नागपूरमधूनही तशाच बातम्या आल्या. अशा अपमृत्यूंनी  पंजाबही हादरले.. आणि आता गोव्यात? आणि तेही केवळ व्यवस्थात्मक अनास्थेमुळे तसेच व्हावे?

छोट्याशा गोव्याला सगळे जग ओळखते. तेथे प्राणवायूअभावी लोकांचा मृत्यू अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. एका रात्री कोविड रुग्णांसाठीच्या वॉर्डातले  ऑक्सिजनचे व्यवस्थापन कोलमडते आणि श्वासासाठी कृत्रिम पुरवठ्यावर अवलंबून असलेले रुग्ण गुदमरून मरतात, दुसऱ्या - तिसऱ्या आणि सलग चौथ्या दिवशीही तेच, तसेच होते. ही घनघोर बेपर्वाई नव्हे तर दुसरे काय आहे? वेळीच परिस्थिती का सावरली गेली नाही? गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात समन्वय नाही. अशा परिस्थितीत राज्य हादरले  असताना सावंत यांना राणे धमक्या देतात, याला काय म्हणावे? ह्यांना कोणती शिक्षा द्यावी? माणूस इतका लाचार, बेजार, पंगू झाला आहे काय? तो बोलू शकत नाही आवाज उठवू शकत नाही.. स्वतःला अभिव्यक्त करू शकत नाही.. विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत राहणे हेच त्याचे नशीब असते?

आता तर लोक कोरोनातून बाहेर पडतात; पण त्यांच्या डोळ्यांना विषाणूजन्य आजार होतो. या आजाराला म्युकरमायकोसिस असे नाव आहे. त्याच्यावरची औषधे आता बाजारातून गायब होत आहेत. सलग चाळीस दिवस रोज चार इंजेक्शन्स द्यावी लागतात. एक इंजेक्शन ८००० रुपयांचे असेल तर सामान्य माणसाने उपचारासाठी इतके पैसे कुठून आणायचे? कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. तिचा प्रकोप अजून चालू आहे. आपण बेसावध राहून चालणार नाही. आपले रक्षण आपल्यालाच करायचे आहे. मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे हे तर करायचेच आहे. आता निदान तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी सरकारने नीट करावी एवढीच माझी अपेक्षा आहे. जिथे सुविधा असतील तेथून शक्य ती सर्व मदत घेऊन सन्मानपूर्वक लोकांचे जीव वाचवा. तरीही दुर्दैवाने ज्यांचा जीव वाचू शकणार नाही, त्यांना निदान सन्मानपूर्वक निरोप तरी मिळू द्या!

(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या