शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

हार कोणाचीही होवो, देश जिंकायला हवा!

By विजय दर्डा | Updated: April 8, 2019 06:37 IST

लोकशाहीच्या महापर्वाच्या १७ व्या अनुष्ठानाचा पहिला अभिषेक आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

- विजय दर्डा 

चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह

लोकशाहीच्या महापर्वाच्या १७ व्या अनुष्ठानाचा पहिला अभिषेक आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या देशाची सत्ता कोणाच्या हाती द्यायची हे तुम्ही मतदार ठरवणार आहात. तुमचे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. तुमच्या मताने उमेदवार आणि पक्षांचीच हार-जीत ठरणार नाही, तर तुम्हाला देश कोणत्या मार्गाने न्यायचा आहे, हेही तुम्ही त्यातून नक्की करणार आहात. म्हणूनच प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे, असे माझे विनम्र आवाहन आहे. पूर्ण विचार करून विवेकाने मतदान करा. मी फक्त एवढेच सांगेन की, जात आणि धर्माच्या आधारे कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. देश प्रगती करतो आपल्या कौशल्याने, आपल्या ध्येय-धोरणांनी आणि आपल्या नागरिकांच्या ऊर्जेने!

आपण मतदानाचा हक्क मोठ्या कष्टाने मिळविला आहे, याची जाणीव ठेवा. शेकडो वर्षांच्या गुलामीतून बाहेर पडल्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून सुप्रस्थापित होणे सोपे नव्हते. आपण स्वतंत्र झालो तेव्हा भारतातील सुमारे ८५ टक्के जनता निरक्षर होती. अशा स्थितीत लोकशाही यशस्वी कशी व्हावी? पण जगाने ज्याची अपेक्षाही केली नव्हती ते आपण करून दाखविले. नानाविध अडचणी व विरोधाभास असूनही भारतात लोकशाही रुजली, यशस्वी झाली. या यशात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे मोठे योगदान आहे. ही परंपरा जपणे, आणखी मजबूत करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.

चला तर भारताने लोकशाहीचा हा खडतर प्रवास जेथून सुरू केला त्या लोकशाहीच्या महापर्वाच्या पहिल्या अनुष्ठानाविषयी जरा जाणून घेऊ या. स्वातंत्र्याच्या आधीही अंतरिम निवडणुका झाल्या, पण त्या फक्त इंग्रजांची सत्ता असलेल्या ११ प्रांतांपुरत्या मर्यादित होत्या. राज्ये व संस्थाने असलेल्या भागातील जनता निवडणुकांपासून वंचितच राहिली. सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण लोकशाही प्रजासत्ताक म्हणून देश उभारणीचा निश्चय केला. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. देश प्रजासत्ताक झाला. याच्या एक दिवस आधी २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. वरिष्ठ आयसीएस अधिकारी सुकुमार सेन यांना देशाचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले गेले. हे सुकुमार सेन थोर गणितीही होते. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात एकाच वेळी निवडणूक घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. एवढी मोठी निवडणूक घेण्याचा अनुभव असलेलेही कोणी नव्हते. परंतु सेन आणि त्यांच्या विश्वासू टीमने कमालीचा निर्धार दाखविला. लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक २५ आॅक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ म्हणजे सुमारे चार महिने चालली. लोकसभेच्या ४८९ व राज्य विधानसभांच्या ३,२८३ जागांसाठी त्या वेळी एकाच वेळी पहिली निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी नोंदलेले मतदार होते १७ कोटी ३२ लाख १२ हजार ३४३, त्यापैकी १० कोटी ५९ लाख मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीचे यश पाहून जग अचंबित झाले.

सेन आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने ती निवडणूक यशस्वी केली ते खरोखरच आश्चर्य वाटावे, असे होते. निरक्षरता एवढी होती की मतदारांना उमेदवारांची नावेही वाचता येत नसत. यावर उपाय म्हणून सेन यांनी निरनिराळ्या निवडणूक चिन्हांसाठी वेगवेगळ्या मतपेट्यांची सोय केली. खासकरून उत्तर भारतात बहुसंख्य महिला स्वत:चे नाव न सांगता ‘अमूक अमूकची पत्नी’ अथवा ‘अमूक अमूकची आई’ अशी ओळख सांगत असत. सेन यांनी बनावट मतदानाची शक्यताही राहू नये यासाठी अशा महिलांची २८ लाख नावे मतदार याद्यांमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या दुसऱ्या निवडणुकीपर्यंत महिलांनी स्वत:चे नाव सांगावे यासाठी त्यांना शिक्षित करून त्यांची नावे मतदार याद्यांमध्ये नोंदविली गेली.

पहिल्या निवडणुकीत लोकसभेच्या ४८९ पैकी ३६४ जागा काँग्रेसने जिंकल्या. राज्य विधानसभांमध्ये ३,२८३ पैकी २,२४७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडले गेले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे १६ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी रेडिओ मॉस्कोने कम्युनिस्ट पक्षाला खूप मदत केली होती. परंतु लोकांनी जवाहरलाल नेहरूंना पसंती दिली. नेहरू त्या वेळी सांप्रदायिकतेवर प्रखर हल्ला चढवायचे.

आपल्या लोकशाहीचा प्रवास किती खडतर झालेला आहे हे तरुण पिढीला कळावे यासाठी मी पहिल्या निवडणुकीबद्दल मुद्दाम सांगितले. सौभाग्याने देशातील निरक्षरता दूर झाली. मतपेट्यांपासून आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांपर्यंत आलो. पण आजही लोकांवर जात, धर्म, संप्रदाय व विचारसरणी यांचा पगडा एवढा आहे की मतदानही त्याच निकषावर केले जाते, हे मोठे दुर्दैव आहे. माझी आग्रहाची विनंती आहे की, मत देण्यापूर्वी याचा नीट विचार करा की,कोणता पक्ष देशाला शक्तिशाली करेल, सामाजिक एकतेची ग्वाही देईल आणि जगात भारताची प्रतिष्ठा वाढवेल. राजकीय पक्षांचे जाहीरनामेही बारकाईने समजून घ्या. त्यातून देशाला योग्य दिशेने कोण नेऊ शकेल, ते ठरवा. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देश सर्वात महत्त्वाचा हे कायम लक्षात ठेवा. राजकीय पक्ष देशाच्या नंतर येतात. या निवडणुकीत कोणीही पक्ष जिंको अथवा हरो, पण काही झाले तरी देश जिंकायलाच हवा! म्हणूनच देशाला विजयी करण्यासाठी मतदान अवश्य करा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक