शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अ‍ॅडमिरल रामदासांची चिंता

By admin | Updated: October 26, 2015 22:51 IST

भारतीय राजकारणावर हिंदुत्वाचा एकारलेला बहुसंख्यांकवाद पद्धतशीरपणे लादण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न देशाच्या ऐक्याला व त्याच्या सर्वसमावेशक स्वरुपाला घातक

भारतीय राजकारणावर हिंदुत्वाचा एकारलेला बहुसंख्यांकवाद पद्धतशीरपणे लादण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न देशाच्या ऐक्याला व त्याच्या सर्वसमावेशक स्वरुपाला घातक असून त्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची विनंती भारताचे माजी आरमार प्रमुख एल. रामदास यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका विस्तृत पत्रातून केली आहे. रामदास यांचे वय आता ८० वर्षांचे असून वयाच्या १४ व्या वर्षापासून तब्बल ४५ वर्षे त्यांनी भारतीय नाविक दलाची सेवा केली आहे. त्याच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाल्यानंतरच्या वृद्धापकाळात त्यांना देशाविषयी वाटत असलेली चिंता त्यांनी या पत्रात फार स्पष्टपणे उघड केली आहे. बहुसंख्यकांच्या हिंदुत्ववादी गटांनी देशात उभा केलेला धार्मिक उन्माद येथील लोकशाहीला व घटनेला घातक ठरणारा आहे असे बजावून रामदास म्हणतात, या उन्मादाने देशातील अल्पसंख्यकांच्या मनात, विशेषत: मुस्लीम, ख्रिश्चन, दलित व आदिवासींच्या जीवनात एक दहशत उभी केली आहे. हे समाज या दहशतीच्या अंधारात वावरत असून त्यांची होत असलेली गळचेपी हा आपला विजय असल्याचा भ्रम घेऊन ही एकारलेली हिंदुत्ववादी माणसे देशात त्यांना हवा तसा धुमाकूळ घालत आहेत, असा आरोप रामदास यांनी केला आहे. भारताचे धर्मबहुल स्वरुप नाहीसे करून त्याचे हिंदू राष्ट्रात रुपांतर करण्याचा संघाचा प्रयत्न जुना तसाच तो पद्धतशीर व आक्रमकही आहे, असे सांगून रामदास म्हणतात, मी स्वत:ही हिंदू आहे मात्र माझे हिंदू असणे सर्वसमावेशक व देशातील साऱ्यांवर प्रेम करणे शिकविणारे आहे. माझ्यावरील हिंदू संस्काराने मला हिंसा वा असहिष्णुता शिकवली नाही. आताचे संघाचे हिंदुत्व देशात पुन्हा एकवार फाळणीचे ज्वालाग्राही वातावरण उभे करणारे व साऱ्या समाजात भीतीचे वातावरण उत्पन्न करणारे आहे. एवढी वर्षे देशाच्या नाविक दलात घालविल्यानंतर आता वयाच्या ८० व्या वर्षी देशाच्या या चित्राने मला माझी मान खाली घालायला लावली आहे. संघाच्या हिंदुत्वाचे आक्रमक स्वरुप २०१४ च्या निवडणुकीनंतर अधिक धारदार व भयकारी झाले असल्याचे सांगून रामदास यांनी हिंदुंच्या अशा झुंडींनी देशात ठिकठिकाणी केलेल्या हिंसाचाराची उदाहरणे आपल्या पत्रात नमूद केली आहेत. या देशातील नागरिकांना ते त्यांची देशभक्ती सिद्ध करायला आता सांगू लागले आहेत. अल्पसंख्यांकांच्या पूजास्थानांवर हल्ले होत आहेत आणि त्यांची विटंबना केली जात आहे. हाच प्रकार दलित व आदिवासींबाबतही होताना मी देशात पाहत आहे असे या पत्रात लिहून रामदास म्हणतात, मी नाविक दलाचे नेतृत्व केले आहे. भारताचे नाविक दल, हवाई दल वा लष्कर यात सर्व जातीधर्माचे व पंथांचे सैनिक आहेत आणि त्यांचे देशप्रेम बावनकशी आहे. देशात उभ्या होत असलेल्या आताच्या धर्मांध राजकारणाचा आपल्या लष्करावर केवढा विपरित परिणाम होत असेल आणि त्यातल्या सैनिकांना त्याने केवढे असुरक्षित वाटायला लावले असेल या चिंतेने मला ग्रासले आहे. दुर्दैव हे की अशा धर्मांधतेला उघडपणे खतपाणी घालण्यात सध्याच्या मंत्रिमंडळातील काही सदस्य व संसदेचे सभासद आघाडीवर आहेत. आपण करीत असलेला उन्मादी प्रचार जनतेएवढाच देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही अनिष्ट परिणाम करू शकतो याचीही साधी जाणीव नसलेली ही उठवळ माणसे आहेत. दु:ख याचे की या उठवळांना अडविण्यासाठी व त्यांना वेसण घालण्यासाठी देशातील एकही सर्वोच्च नेता पुढे येताना दिसत नाही. आताच्या उन्मादासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरताना रामदास म्हणतात, या संघटनेने दिलेल्या चिथावणीमुळे देशातील अनेक लहानसहान गट हिंसक बनले व त्यांनी अनेक राज्यात हत्त्याकांडे घडवली आहेत. त्यांना देश, कायदा, घटना, समाज व संस्कृती आणि त्या साऱ्यांनी आपल्याला शिकविलेली सहिष्णुता यांच्याशी काहीएक घेणेदेणे नाही. एका धार्मिक उन्मादापायी ही माणसे त्यांचे देशकर्तव्य विसरली आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी कोणीही पुढे होताना न दिसणे ही राष्ट्रीय शोकांतिका आहे. रामदास आपल्या पत्रात असेही म्हणतात की सरकार मग ते केंद्रातले असो वा राज्यातले, या घटनांकडे क्षुल्लक म्हणून पाहू लागले असावे अशी मला शंका येते. हा सारा आगीशी खेळण्याचा प्रकार आहे. लोकांचा एक समूह इतर साऱ्यांविरुद्ध उभा करण्याचा हा डाव आहे. यातून केवळ धर्मांधताच वाढत नाही तर वंशवाद वाढीला लागून त्याचे रुपांतर फॅसिझममध्ये होत असते. या घटनाक्रमाने देशाची आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रतिमाही मलीन केली आहे याचेही दु:ख कोणाला होत नसल्याचे पहावे लागणे याएवढे मोठे दुर्दैव दुसरे नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना राष्ट्रपतींनी या देशाच्या घटनेचे संरक्षण करण्याची शपथ दिली आहे. या शपथेचा विसर या देशाच्या सुरक्षेएवढाच त्याच्या एकात्मतेला धोका उत्पन्न करणारा आहे. केंद्र व राज्य सरकारांनी तात्काळ जागे होणे व देशातील धर्मांध शक्तींना आणि त्या जागविणाऱ्या संघटनांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. देशाच्या आरमाराची वस्त्रे साडेचार दशके अंगावर वागविलेल्या एका ज्येष्ठ व वयोवृद्ध अ‍ॅडमिरलची ही चिंता आहे व तिचे निराकरण करणे देशाच्या राजकीय नेतृत्वाचे कर्तव्य आहे.