लातूर आणि बीदर या दोन जिल्ह्यांची भाषा वेगळी. राज्य वेगळे. संस्कृतीही वेगळी. तरी दोन्ही जिल्ह्यांत एक रक्ताचे नाते आहे. म्हणूनच या दोन्ही जिल्ह्यांत रोटीबेटी व्यवहार चालतो. एवढे वेगळेपण असतानाही कोणाच्या संसारात बाधा येत नाही. बीदरमध्ये मराठी भाषा जेवढ्या प्रेमाने बोलली जाते तेवढाच आदर लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात कानडी भाषेला घराघरात दिला जातो. अशा या दोन जिल्ह्यांतील रक्ताच्या नात्यामध्ये अलीकडे दरी वाढत आहे. निमित्त केवळ एका रेल्वेचे आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रचंड प्रयत्नानंतर २००७ साली पहिल्यांदा लातूर-मुंबई एक्स्प्रेस धावली. एकूण १८ बोगी असलेल्या या रेल्वेची प्रवासी क्षमता १२७६ इतकी आहे. मुंबईला जाण्यासाठी लातूरकरांना सोयीचा दुसरा पर्याय नसल्याने या रेल्वेतून दररोज २२०० ते २३०० जण प्रवास करतात. यातले अनेक जण उभे राहून प्रवास करतात. असे असताना ही रेल्वे मागील आठवड्यापासून बीदरपासून धावू लागली असून, ती आता बीदर एक्स्प्रेस झाली आहे. आरक्षण मिळण्यास आधीच मारामार असताना आता बीदर, उदगीरची भर पडल्याने लातूरकर संतापले आहेत. या निर्णयाविरुद्ध मोठे आंदोलन उभारले जात आहे. लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि बीदरचे खासदार भगवंत खुब्बा या निर्णयावर आनंदी आहेत, तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसह इतर सर्वच पक्षांचे नेते विरोधात आहेत. मूळ प्रश्न बाजूला ठेवून वातावरण तापविण्याचेच हे दिवस आहेत. लातुरात तेच होताना दिसत आहे. आता बीदरपर्यंत धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद किती मिळतो हे पाहून बोग्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या १८ वरून २४ बोग्यांची रेल्वे या मार्गावरून धावू शकते. त्यामुळे या रेल्वेला २४ बोग्या कराव्यात आणि त्यातील काही बोग्या लातूर, काही उदगीरसाठी, तर काही बोग्या बीदरसाठी आरक्षित ठेवाव्यात हा सर्वांच्या सोयीचा मार्ग होऊ शकतो; परंतु अशी मागणी कोणीच करताना दिसत नाही. आम्ही मोठ्या कष्टाने आणलेली रेल्वे तुम्हाला कशासाठी द्यायची, हा भावनिक मुद्दा रेल्वेच्या कोर्टात कधीच टिकणारा नाही. ही रेल्वे लातूरला थांबवून ठेवण्यापेक्षा पुढे उदगीर-बीदरपर्यंत नेणे शक्य असेल तर व्यावहारिकदृष्ट्या ते योग्यच आहे. असे करून लातूरकरांवर अन्याय होऊ नये एवढेच. याच मागणीसाठी आंदोलन व्हायला हवे; पण तसे होताना दिसत नाही. भावनिक प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांना कामाला लावायचे, हाच उद्योग सर्वत्र सुरू आहे. लातूरही त्याला अपवाद नाही. बीदर एक्स्प्रेसचा फायदा एकट्या बीदरला नाही तर, लातूर जिल्ह्याचाच मोठा भाग असलेल्या उदगीर, देवणी तालुक्यांनाही होणार आहे. लातूरनंतर जिल्ह्यात उदगीर हीच मोठी व्यापारपेठ आहे. त्यामुळे बोग्यांची संख्या वाढवा म्हणून बीदर, उदगीर आणि लातूरकरांनी एकत्रित आंदोलन करायला हवे. रक्ताचे नाते न तोडता अशी प्रेमाची हाक देऊन सर्वांचाच प्रश्न सुटू शकतो. मग तोडण्याचीच भाषा कशासाठी?
भाष्य - रक्ताचे नाते दुरावू नये...
By admin | Updated: May 3, 2017 00:15 IST