शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
2
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
3
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
4
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
5
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
6
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
8
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
9
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
10
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
13
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
14
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
15
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
16
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
17
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
18
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
19
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
20
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा

अण्णा : ओसरलेल्या महात्म्याची कथा

By admin | Updated: May 11, 2017 00:24 IST

अण्णा हजारे हे दिवसेंदिवस जास्तीचे हास्यास्पद होऊ लागले आहेत. त्यांची नजरही केंद्राकडून केंद्रशासित सरकारांकडे घसरत चालली आहे.

अण्णा हजारे हे दिवसेंदिवस जास्तीचे हास्यास्पद होऊ लागले आहेत. त्यांची नजरही केंद्राकडून केंद्रशासित सरकारांकडे घसरत चालली आहे. कधीकाळी मिनी गांधी किंवा दुसरे जयप्रकाश म्हणून माध्यमांनी फुगविलेले त्यांचे महात्म्य त्यांना खरेच वाटू लागले आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात त्यांनी जे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन मांडले त्याला पाठिंबा देणाऱ्या व संध्याकाळी फिरायला येणाऱ्या माणसांच्या गर्दीचा चेहरा नीट न उमगलेल्या अण्णांना त्यात जनतेच्या लढ्याची उभारी दिसली. ते आंदोलन आणि त्यातले केजरीवाल, योगेंद्र, प्रशांत व किरण बेदी यांच्या करामती पहायला जमणाऱ्या गर्दीत संघ आणि भाजपाचे लोक मोठ्या संख्येने असत आणि त्या आंदोलनाचा लाभ आपल्याला कसा होईल याची आखणी करणारी माणसे दिल्ली आणि नागपूरच्या संघ कार्यालयात बसली असत. अण्णांची पाठ वळली की केजरीवालांपासून किरण बेदींपर्यंतची माणसे त्यांच्या राजकीय अज्ञानाबद्दल आणि प्रसिद्धीने फुगून जाण्याच्या वृत्तीबद्दल काय बोलत होती हे त्यांच्याच भोवती वावरणारी माणसे त्या काळात सांगत. मात्र एकदा डोक्यात महात्म्य शिरले आणि आपल्या ‘वजना’चा नको तेवढा विश्वास मनात उभा राहिला की मोठ्या माणसांचेही वास्तवाचे भान हरपते. गेली तीन वर्षे अण्णा अज्ञातवासात आहेत. ते दिल्लीला आले वा गेले तरी त्यांची कोणी दखल घेताना दिसले नाही. त्यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन सत्तेवर येऊ शकलेल्या मोदी सरकारला त्यांच्या अस्तित्वाचीही दखल घेण्याची गरज वाटली नाही आणि अण्णांनाही मोदींच्या सत्तेपुढे त्यांनी कधीकाळी शिरोधार्ह मानलेल्या मूल्यांची पर्वा उरली नाही. म. गांधी व त्यांचा सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष राजकारण, सर्वसमावेशक समाजकारण आणि देशातील बहुसंख्यकांएवढाच अल्पसंख्यकांचाही कळवळा अण्णांनाही एकेकाळी वाटत होता. आताचे राजकारण या सर्व मूल्यांना तिलांजली देणारे, धर्मनिरपेक्षतेकडून धर्मांधतेकडे, सर्वधर्मसमभावाहून बहुसंख्यकवादाकडे आणि धर्माच्या नावावर देशात नव्याने दुहीचे वातावरण निर्माण करणारे आहे ही गोष्ट वर्तमानपत्रे वाचणारा साधाही माणूस सांगू शकेल. मात्र या विपरीत बदलाची दखल अण्णांना राळेगणसिद्धीत बसून घेता आली नाही. मात्र त्यांच्या मनातला काँग्रेसवरील रोष एवढा खोलवर आणि टोकाचा की या प्रकाराविषयी त्यांना तोंड उघडून बोलावे असे कधी वाटले नाही. (त्यांची पत्रके लिहून देणारी माणसेही या काळात त्यांच्यापासून दूर गेल्याने त्यांच्या बोलण्याविषयीच तेवढे लिहिणे येथे भाग आहे) अल्पसंख्यकांची गळचेपी ते पाहतात, मुस्लीमविरोधी धोरणांची दाबून केली जाणारी अंमलबजावणी त्यांना दिसते, हिंदुत्ववादी हिंसाचारी न्यायालयातून सोडले जाताना ते पाहतात आणि अल्पसंख्यकांमधील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा केली जातानाही त्यांना दिसते. मात्र या स्थितीत अण्णांना गांधी आठवत नाहीत. त्यांची मूल्ये आठवत नाहीत. जयप्रकाशांचे स्मरण त्यांना होत नाही. व्यापक लोकशाहीसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची गोष्टही त्यांच्या मनात येत नाही. ते मोदींविषयी बोलत नाहीत. त्यांनी राज्यपालपद दिलेल्या बेदींनाही बोल लावीत नाहीत. त्यांच्या सरकारविषयी वक्तव्ये देत नाहीत. देशाच्या एकारत चाललेल्या राजकारणाची त्यांना चिंता नाही. केंद्र सरकारने ललित मोदीला देशाबाहेर पळून जाऊ दिल्याची वा मल्ल्याने देश बुडवून सरकारच्या मदतीने तो सोडल्याची फिकीर त्यांनी केल्याचेही कधी दिसले नाही. गेली तीन वर्षे घसरत चाललेले व आपल्या जवळच्या गुन्हेगारांना पाठीशी घालत रखडलेले हे राजकारण अण्णांना अस्वस्थ करून गेल्याचेही कुणाला आढळले नाही. हे सारे अत्यंत स्वस्थ चित्ताने आणि गूढ वाटाव्या अशा वृत्तीने पाहणाऱ्या या अण्णांना आता मात्र केजरीवालांवर झालेल्या दोन कोटींच्या कथित आरोपाने जाग आली आहे आणि केजरीवालांवरील आरोप खरा ठरला तर जंतरमंतरवर पुन: उपोषणासारखे आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मल्ल्यांचा ८ हजार कोटींचा भ्रष्टाचार खपवून घेणारे, ललित मोदींचा क्रिकेट घोटाळा सांभाळून घेणारे, दलितांवर अत्याचार, अल्पसंख्यकांच्या हत्या आणि आपल्या राजकारणासाठी घटनेची पायमल्ली करणारे केंद्र सरकार ज्या अण्णांना अस्वस्थ करीत नाही, त्यांना केजरीवालांचा दोन कोटींचा कथित भ्रष्टाचार आंदोलनासाठी पुन: दिल्लीत आणत असेल तर त्यातले गूढ साऱ्यांना समजले पाहिजे. केजरीवालांना त्यांचे मुख्यमंत्रीपद आपल्यामुळे मिळाले असे अण्णांना वाटत असल्याचा हा पश्चाताप आहे, केंद्र सरकारच्या मूल्यविषयक विपरीत पावलांबाबत आजवर बाळगलेल्या मौनाचा हा निचरा आहे की आपले अस्तित्व कोणीच कसे ध्यानात घेत नाही याची चिंता त्यांना आहे, हे त्यांच्या या उठावातून निर्माण होणारे खरे प्रश्न आहेत. मोठ्या व वाढत्या सत्तेविरुद्ध बोलायला कचरणारी माणसे लहान व बुडत्या राजकारणाला जेव्हा आपले लक्ष्य बनवितात तेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात. अण्णांसारखी अल्पकाळात मोठी प्रसिद्धी पावलेली माणसे अशा प्रश्नांना कारण होतात तेव्हा ते जास्तीचे उद्विग्न करणारे प्रकरण ठरते. त्यांनी निर्माण केलेल्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मग ज्यांची त्यांनीच मनात समजूनही घ्यायची असतात.