शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

..हा तर म्हशीसमोरचा कडबा झाला, श्रीयुत मनोहर भिडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 09:41 IST

भूतकाळाच्या शिंक्यातले लोणी मटकावण्याच्या लालसेने इतकी डोकी फिरलेली असताना तुम्हाला अनुल्लेखाने दूर सारणे कसे परवडेल ?

- अपर्णा वेलणकर

श्रीयुत मनोहर भिडे, भारतमाता ही सौभाग्यवती आहे, विधवा नाही.. त्यामुळे मुलींनी आपले कपाळ रिकामे ठेवू नये, कपाळावर टिकली लावावी, कारण मुली आणि स्त्रिया हे भारतमातेचेच रूप असते, असा सल्ला तुम्ही एका पत्रकार तरुणीला दिलात. वरून तिला हेही सांगितलेत, की आधी टिकली लावून ये, मग तुझ्याशी बोलतो! यावरून आता वाद पेटला आहे, म्हणजे तुम्ही खूशच असाल. फार दिवसात कुणी तुम्हाला फारसे विचारले नव्हते; आता जो-तो/जी-ती तुमच्याच मागे! आधुनिक जगातल्या विचारांचा वाराही लागू नये म्हणून अति संकुचित परिघात चिणून घेतलेले आणि सतत जातीपातीच्या, भेदभावांच्या कर्दमात रुतून असलेले तुमचे व्रतस्थ की काय ते जीवन, आता निदान दोनेक दिवस तरी सोशल मीडियात तुम्ही झळकत राहाल, मनोहर भिडे! केवढा तो गलबला!!

कपाळावर टिकली लावा सांगितलेत म्हणून चिडलेल्या विचारी स्त्रियांनी तुमच्या विरोधातला संताप नोंदवण्यासाठी हॅशटॅग  तयार केलेत... आणि शिकल्यासवरल्या मुलीबाळींंचे आधुनिक वर्तन अजिबात सहन न होणाऱ्या, त्यांच्या आत्मविश्वासाचे-आत्मभानाचे भय वाटणाऱ्यांनी  अचूक संधी साधून तुमच्या सदा फिस्कारलेल्या सनातनी मिशीआडून आपापले बाण मारणेही सुरू केले आहे. काय तर म्हणे, लावली टिकली तर काय बिघडले? कपाळावर कुंकू लावणे ही  ‘आपली’ संस्कृतीच आहे, कुंकू लावायला लाज वाटते का?... काही महिन्यांपूर्वी #नोटिकलीनोबिझिनेस असा फतवा काढणाऱ्यांनी तर अत्याधुनिक युगातली टेक्नॉलॉजी वापरून पुराणकाळातल्या चिखलातच जगत राहण्याच्या आपल्या अचाट सामर्थ्याचे  निर्लज्ज प्रदर्शन  टिकलीच्या निमित्ताने पुन्हा एकवार भरवले आहे, मनोहर भिडे! त्यांनाही वाटतेच, बाईने उंबरठ्याआत असावे, नजर खाली ठेवावी, खांद्यावरचा पदर आणि डोईवरची संस्कृती सांभाळावी.

बाई जागची हलली की संस्कृतीचा कडेलोटच!! कुणाही विचारी नागरिकाला त्रास होईल असे बरेच काही सध्या देशात घडते आहे. त्याकडे बारीक दुर्लक्ष व्हायला हवे, तर माध्यमांच्या उपाशी म्हशीसमोर चघळायला कडबा टाकावा लागतोच हल्ली. तुम्ही तो कडबा आहात, असे काहींचे म्हणणे, मनोहर भिडे! कधी म्हणता अमक्या झाडाचा आंबा खाल्ला की हमखास मुलगाच होतो, कधी म्हणता भारतमाता विधवा नाही!...तुम्ही स्वत:च सिध्द करता हे वेळोवेळी, की उद्योग नसलेल्यांना चघळत बसायला कडबा यापलीकडे विचारी जनांनी लक्ष द्यावे, असे काही तुमच्यापाशी नाहीच! ज्या कोणत्या संस्कृतीच्या अतिउच्चतेचा धाक घालून आपले काम चोख करत असलेल्या एका तरुणीला तुम्ही उध्दटपणे फटकारलेत; त्या संस्कृतीने किमान सभ्यता आणि संकेतांचीही एक चौकट रेखलेली आहे, हे तुम्ही कधीच वाचले/ऐकले नाही का हो, मनोहर भिडे? 

काही लोक म्हणतात, त्या मुलीने तिथल्या तिथेच उलट उत्तर देऊन तुमचा रुबाब उतरवायला हवा होता! - पण हे इतके सोपे नाही. बाईने टिकली लावलीच पाहिजे, बुरखा घातलाच पाहिजे किंवा घातला नाहीच पाहिजे हे असले फतवे काढणाऱ्यांचा  धर्म कोणताही असो, आधुनिक समकालीन स्त्रियांची स्वतंत्र झेप सहन न होण्याच्या दुखण्याचे ते सांगता येऊ नये अशा अवघड जागी झालेले गळू आहे. धर्म, लिंग, जात, देश अशा कोणत्याच निकषाच्या आधाराने कोणाच्याही बाबतीत केला गेलेला दुजाभाव वर्ज्य मानणाऱ्या आधुनिक विचारधारेमुळे ज्यांच्या बुडाखालच्या जुन्या खुर्च्यांना  सुरुंग लागले, ते सगळेच रेटारेटी करून अधिकाधिक जुनाट, सनातन होण्याच्या स्पर्धेत जणू धावत सुटले आहेत. हे आपल्याच देशात नाही, जगभर घडते आहे.

आधुनिक जगातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे, संपर्क-जाळ्यांचे, शिक्षण-संधींचे सगळे फायदे हवेत, पण सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनाचे नियमन करणाऱ्या साऱ्या  समाजरचना मात्र सनातन काळातल्याच हव्यात असला विचित्र उन्माद जगभरात वाढतो आहे. या उन्मादाला संस्कृती-रक्षणाचा झगमगता वर्खही आहे. एकाच वेळी वर्तमानाचे फायदे लाटून भूतकाळाच्या शिंक्यातले लोणी मटकावण्याच्या या लालसेने भल्याभल्यांची डोकी फिरलेली असताना तुमच्यासारख्या संस्कृती-शिरोमणीला अनुल्लेखाने दूर सारणे कसे परवडेल, मनोहर भिडे! - म्हणूनच केवळ सांगायला हवे, बाईने टिकली लावावी की लावू नये हे तिचे ती ठरवेल. आपण जरा थंड घ्या!! 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीWomenमहिला