- डॉ. पराग संचेतीअध्यक्ष : (एमओए), पुणेअस्थिरोगावरील नवनवीन शस्त्रक्रियांची माहिती व प्रचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र आॅर्थोपेडिक्स असोसिएशनची स्थापना १९८३ साली महाराष्ट्रातील अस्थिरोग तज्ज्ञांनी केली. महाराष्ट्र आॅर्थोपेडिक्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील अस्थिरोग तज्ज्ञांची सर्वोच्च संघटना असून, संपूर्ण महाराष्ट्रातील १६०० हून अधिक सभासद या संघटनेमध्ये आहेत.महाराष्ट्र दिनाचे महत्त्व लक्षात घेता, महाराष्ट्र असोसिएशनने १ मे हा त्यांचा स्थापना दिवस घोषित केला. या दिवसाचे औचित्य साधून १ मे हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व तालुकास्तरीय संघटना आणि महाराष्ट्र आॅर्थोपेडिक्स असोसिएशन एकत्रित येऊन मोफत अस्थिरोग शिबिर तसेच जनजागृती करण्याकरिता व्याख्यानमाला आयोजित केली जाणार आहे. यामध्ये साधारणत: अस्थिरोगामधील काही विकारांचा समावेश जसे गुडघेदुखी, पाठदुखी, संधिवात आणि ‘गोल्डन अवरचे महत्त्व’ सांगितले जाईल. हा उपक्रम १ मे ते ६ मेपर्यंत राबविण्यात येणार आहे. अनेक छोट्या संघटनांद्वारे जास्तीत जास्त सामान्य लोकांमध्ये जागृती करण्यासाठी तसेच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम आजोजित केले आहेत. मोफत तपासणी शिबिर याबरोबरच अनेक तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे.१ मे महाराष्ट्र आॅर्थोपेडिक्स असोसिएशनचा मुख्य उद्देश सामान्य लोकांमध्ये अस्थिरोग विकारांबद्दल जनजागृती तसेच अस्थिरोगांवरील तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, तेही विनामूल्य. जनजागृती, कार्यशाळा आणि चर्चासत्र यांचे आयोजन शाळा, महाविद्यालय आणि वरिष्ठ नागरिकांमध्ये केले जाणार आहे. या उपक्रमांमुळे लोकांमधील अस्थिरोगावरील गैरसमज दूर करण्यास मदत होऊन रुग्ण आणि चिकित्सक संबंध अधिक दृढ होतील. या उपक्रमामध्ये नक्कीच सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष मदत होईल. महाराष्ट्र आॅर्थोपेडिक्स असोसिएशन, कार्यकारी समिती आणि तालुका संघटना यांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी या उपक्रमामध्ये सामील होऊन महाराष्ट्रातील जनतेला जास्तीत जास्त फायदा करून द्यावा. मला विश्वास आहे की, या उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता अस्थिरोगमुक्त होऊन सुदृढ होईल.
१ मे महाराष्ट्र आॅर्थोपेडिक्स असोसिएशन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 03:56 IST