लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर निजामपूर- जैताणे परिसरात शासनाचे जलसिंचनाकडे दोन-तीन दशकांपासून दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, दुरवस्थेत असलेल्या पाच बंधाऱ्यांची साक्री पं.स. लघु पाटबंधारे विभागाने पाहणी केली. त्यामुळे आता तरी पावसाळ्यापूर्वी ते दुरुस्त होऊन उपयोगात आणले जातील का, असा सवाल केला जात आहे.‘पाणी अडवा पाणी जिरवा’वर भर दिला जात असला तरी बांधलेले बंधारे अनेक वर्षांपासून थेंबभर पाणीही अडवू शकत नसल्याची विदारक स्थिती आहे. पावसाळ्यात रोहिणी नदीस पूर येतो. मात्र, जागोजागी बंधारे निकामी असल्याने पाणी वाहून जाते. एकंदरीत या भागात जलसिंचनाची ऐसी तैसी झाली आहे.साक्री तालुक्यातील आखाडेजवळ रोहिणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गेल्या दोन दशकांपासून अपूर्णावस्थेत पडून आहे. फळ्या बसल्याच नाही. शेवटचा टप्पा पुर्ण झाला नाही व बंधारा उपयोगात पण आला नाही. शासनाचे पैसे वाया गेले. त्याबद्दल कुणी साधी चौकशी देखील केली नाही. बंधाºयांचे दगड, लोखंड चोरीला गेले.दरम्यान, निजामपूरचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य हर्षवर्धन दहिते आणि पं.स. सदस्य सतीश राणे यांनी येथील जलसिंचनाची स्थिती विचारात घेऊन पं.स. लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता महाजन यांना पाहणीसाठी पाठविले. यावेळी माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे, भाजपा अध्यक्ष महेंद्र वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, विजय रामचंद्र वाणी उपस्थित होते.नंदुरबार रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळील नादुरुस्त बंधारा, अजितचंद्र शाह यांच्या शेताजवळील नादुरुस्त बंधाºयाची पाहणी करण्यात आली. तसेच रोहिणी नदीत गावाच्या पश्चिमेस असलेल्या केटीवेअरची पाहणी केली. ग्रामपालिकेने गत पावसाळ्याआधी गाळाने पूर्णपणे भरलेल्या या बंधाºयातून गाळ काढला होता. परंतू बंधारा गळत असल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. त्याचे पुढे अजून एक बंधारा असून त्याचीही पाहणी केली.१५ वर्षांपासून रोहिणी नदीवरील पुलाच्या खाली एका मोठ्या केटीवेअरचे सर्वेक्षण झाले होते. पण ते होऊच शकले नाही. ते व्हावे यासाठी जनतेकडून सातत्याने मागणी होत होती. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. एकंदरीत या भागात जलसिंचनाकडे शासनाचे दुर्लक्षच राहिले, असे म्हणावे लागेल. आता या पाहणीनंतर तरी जिल्हा परिषदेकडून बंधाºयांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होईल व त्यात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा आहे.
नादुरुस्त ५ बंधाऱ्यांची जि.प.ने केली पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:44 IST