साक्री - साक्री व बागलान तालुक्याला जोडणाऱ्या पिसोळ बारीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सटाणा तालुक्यातील एक युवक ठार झाला आहे. या घटनेमुळे दिघावे परिसर व सटाणा तालुक्यात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्यात तरूण ठार झाल्याची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. पिसोळबारी ही सटाणा व साक्री तालुक्याला जोडते. सटाणा तालुक्यात व साक्री तालुक्यात येण्या-जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून हा रस्ता दुरुस्त झाल्याने अनेक वाहनधारक याच रस्त्याचा वापर करतात. सटाणा तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी नंदकिशोर धोंडू पवार वय ४१ नंदिन शिवारातील शेतात वास्तव्य होता. पवार हा नेहमी प्रमाणे दुचाकीने दिघावे येथे आला. दिघावे येथून परत जात असतांना सायंकाळच्या सुमारास पिसोळ बारीत बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करुन जंगलात ओढून नेले व त्यांच्या शरीराचे लचके तोडले. यात पवार याचा जागीच मृत्यू झाला. रात्री घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता पिसोळबारीत त्यांची दुचाकी आढळून आली परिसरात शोध घेतल्यावर नंदकिशोर हा तरूण गंभीर जखमी अवस्थेत आला. त्यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. नंदकिशोर पवार यांचा पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.