धुळे - शेतातून ट्रॅक्टर आणल्याच्या कारणावरून तरुणाला लोखंडी रॉड व सळईने मारहाण केल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी घडली. यात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरपूर तालुक्यातील वरवाडे शिवारात असलेल्या एका शेतातून तरुणाने ट्रॅक्टर नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुण आणि अन्य जणांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी झालेले भांडण मिटलेले असताना पुन्हा सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शेतात झालेल्या भांडणाची कुरापत काढण्यात आली. शिवीगाळ करीत घरात घुसून मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. यात लोखंडी रॉड व लोखंडाच्या सळईचा सर्रासपणे वापर केल्याने डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. यावेळी घरात असलेले आई-वडील, भाऊ यांनाही मारहाण करण्यात आल्याने त्यांनाही दुखापत झाली. या झटापटीत, मारहाणीत ५ ग्रॅम सोन्याची चेन लंपास करण्यात आली.याप्रकरणी २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नितीन संतोष माळी (वय ३१, रा. वरवाडे, शिरपूर) या तरुणाने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मनोज राजेंद्र माळी, बाळा बापू माळी, बाळाचा लहान भाऊ, राजू छगन माळी, संजय छगन माळी यांच्यासह १० जणांविरुद्ध संशयावरुन गुन्हा नोंद केला. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. मुरकुटे घटनेचा तपास करीत आहेत.
क्षुल्लक कारणावरुन तरुणाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 22:26 IST