हस्ती स्कूलचे व्हर्च्युअल शिक्षण हे, जसे फिजिकल स्कूल काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असते; त्याप्रमाणेच व्हर्च्युअल शिक्षणही सुरू आहे. हेच हस्ती शाळेचे वैशिष्ट्य आहे.
कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे "श्री गणेशा - ट्री गणेशा !" या संकल्पनेनुसार मातीपासून श्री गणेश मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या फुलझाडाचे, फळझाडाचे अथवा कोणत्याही झाडाचे 'बी' घेऊन त्या 'बी' चे रोपण मूर्तीत करायचे होते. अर्थात अशा श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर, मूर्तीत केलेल्या 'बी' रोपणाला अंकुर आलेला असेल. ते अंकुर फुटलेले 'बी' मातीसह घराच्या अंगणात, परिसरात अथवा जिथे वृक्षारोपण करायचे असेल, अशा ठिकाणी विद्यार्थी वापर करू शकतात.
या व्हर्च्युअल कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक भूषण दीक्षित यांनी केले. यानंतर या कार्यशाळेत हस्तीचे कलाशिक्षक मनोहर यादव यांनी विद्यार्थ्यांना शाडूपासून मूर्ती कशी तयार करावी ? मातीचा गोळा बनविण्यासाठी पाणी किती प्रमाणात घ्यावे ? ओल्या मातीचा गोळा किती व केवढा गोळा घ्यावा ? या गोळ्यांना श्री गणेशाचे हात, पाय, सोंड, दात, मुकुट तसेच पोटाच्या आकारात आवडत्या फुलझाडाचे अथवा फळझाडाचे किंवा वृक्षाचे 'बी' कसे रोपण करावे ? पितांबर, शेला, गणेशाचे अलंकार यांना कसा आकार द्यावा? याविषयी प्रात्यक्षिकासह ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासद्वारा मार्गदर्शन केले. तसेच श्री गणेश मूर्ती सुकल्यावर मूर्तीला सुंदर व आकर्षक आणि मनोहारी रूप साकार करण्यासाठी कोणता रंग कसा वापरावा ? रंग लेपन कसे करावे ? रंगसंगती कशी असावी ? याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच श्री गणेश चतुर्थीला आपल्या घरी स्वत: तयार केलेल्या या श्री बाप्पांच्या इको फ्रेण्डली मूर्तीची स्थापना करावी व मूर्तीचे विसर्जनही घरीच करावे. मूर्तीत रोपण केलेला अंकुरलेला 'बी'चा मातीचा गोळा घेऊन त्याचे अंगणात अथवा परिसरात रोपण करावे. याबाबतही आवाहन करण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता ३री ते १०वीचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.