बळसाणे : अतिवृष्टीच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले़ सध्याच्या परिस्थितीत हाताशी आलेल्या कापूस वेचणीसाठी प्रति किलो दहा ते बारा रुपये मजुरी देऊनही मजुरांचा शोध घेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ फुटलेल्या कपाशी वेचायला मंजुर मिळत नसल्याने कापूस जमिनीवर टेकू लागला आहे़ यामुळे बळसाणेसह माळमाथा भागाचा शेतकरी पुर्णत: मेटाकुटीला आलेला आहे़बळसाणे व माळमाथा परिसरातील मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड झालेली आहे़ जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने बियाणे, खते, फवारणी, मजुरीसह मशागत यांच्यासह आदींचा खर्च वाया जाईल की काय अशी अवस्था झाली होती़ परतीच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली पीक मातीमोल झाले़पानगळ होऊन कपाशीची बोंडे काळी पडली तर बाजरी भुईसकट झाली़ कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला़ या पीकांसह शेतातील भाजीपाला, मका आदी पिकांचे पुर्णपणे नायनाट झाल्याचे दिसून येत आहे़ वेचणीला आलेला कापूस शेतात साचलेल्या डबक्यामुळे व ओलसर जमिन असल्याने वेचता येईना़ या पेचात शेतकरी हिरावून गेला आहे़ मात्र, मागील आठवडा भरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील कापूस वेचणीसाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे़ कापूस वेचणीसाठी मजुरांना वाढीव पैसे तसेच जाण्या-येण्यासाठी वाहने देऊन मजुरांची सरबत्ती असल्याचे चित्र बळसाणे व माळमाथा भागात पहावयास मिळत आहे़ नुकतीच शाळा सुरु झाल्याने लहान मुलांनी ही शेताकडे पाठ फिरावल्याचे दिसून येत आहे़ आजही मजुरांची चणचण या भागात निर्माण झाली आहे़ बाहेरुन मजुरांचा ताफा येत आहे़ शेतात फुटलेला कापूस जमिनीला टेकू लागला आहे व बहुतेक ठिकाणी रात्री बे रात्री कापूस चोरीला जात असल्याच्याही घटना घडत आहेत़ माळमाथा परिसरात बहुतांश ठिकाणच्या जमिनीत ओलसर असल्याने मजुर कामाला स्पष्टपणे नकार देत आहे़ थंडीचे प्रमाण तसे कमी असल्याने रब्बीच्या पेरण्या देखील या भागात खोळंबल्या आहेत़ पण, जेवढा कापूस हातात लागेल तेवढे घेण्याच्या मागे शेतकरी व मजूर अडकला आहे़ कापूस पीक अत्यंत कमी आल्याचे शेतकºयांनी सांगितले़
बळसाणेसह परिसरात मजुरांचा भासतोय तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:00 IST