धुळे : काेरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तपासणी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किती प्रमाणात अँटिबॉडीज वाढल्या, याची उत्सुकता असल्याने अँटिबॉडीज करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अँटिबॉडीज तपासण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील पाच लाखापेक्षा अधिक नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. मात्र अँटिबॉडीज तपासायची गरज नसल्याचे सांगण्यात आले.
रोज २० च्या वर तपासण्या
शहरात असलेल्या खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये दररोज २० पेक्षा अधिक नागरिक अँटिबॉडीज तपासणी करत आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत म्हणून अँटिबॉडीज तपासणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढल्यानंतर अँटिबॉडीज तपासणी संख्येत वाढ झाली आहे.
मुले, ज्येष्ठांची संख्या जास्त
कोरोनाची लागण होऊन गेली आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी अँटिबॉडीज टेस्ट करणाऱ्या लहान बालकांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती डॉ. गौरव अग्रवाल यांनी दिली. तसेच ज्येेष्ठ नागरिकांची संख्याही अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासणी करायची गरज नाही
कोरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तपासण्याची कोणतीही आवश्यकता नाही. केवळ उत्सुकता आहे म्हणून अँटिबॉडीज टेस्ट करणे चुकीचे आहे. दोन्ही डोस घेतले तरी बेफिकिरी दाखवू नये. कोरोना नियम पाळणे गरजेचे आहेच.
- डॉ. महेश भडांगे, जिल्हा शल्यचिकित्सक
पहिला डोस ४०६७०७
दुसरा डोस ११२९९०
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण ३० टक्के