धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना यापूर्वी काही दिवस विलगीकरणात ठेवले जात होते. मात्र, आता डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरणात न ठेवता सतत ड्युटी लावली जात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सुरक्षेचं काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सुरुवातीचे काही महिने कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. मात्र, त्यानंतर बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरुवातीला १४ दिवस ड्युटी व १४ दिवस विलगीकरणात राहावे लागायचे. त्यानंतर आलेल्या नवीन नियमानुसार १४ दिवसांच्या ड्युटीनंतर ५ दिवस विलगीकरणात राहावे लागायचे. बेडीत रुग्णांवर उपचार करीत असल्याने तसेच कोविड वॉर्डात वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग झालाच, तर कुटुंबीयांना किंवा इतर रुग्णांना संसर्ग होऊ नये यासाठी विलगीकरण करावे लागत होते. मात्र, रुग्णांची संख्या वाढल्याने मनुष्यबळ अपूर्ण पडत आहे. म्हणून विलगीकरण बंद करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. काही दिवस विलगीकरण आवश्यक असल्याच्या भावना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रतिक्रिया -
आरोग्य कर्मचारी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करीत आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच लसीकरणही सुरू आहे. आधीच मनुष्यबळ अपूर्ण आहे. तसेच लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे विलगीकरण करणे शक्य होते. सर्व आरोग्य कर्मचारी अविरत सेवा देत आहेत.
- महिला आरोग्य अधिकारी
रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी योद्धाप्रमाणे लढतो आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे विलगीकरणाची आवश्यकता वाटत नाही. लसीकरणाच्या आधी विलगीकरणात राहावे लागायचे. मात्र, आता त्याची गरज वाटत नाही.
- चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हिरे महाविद्यालय
कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करीत आहेत. मात्र, डॉक्टर काम करीत नसल्याचा आरोप केला जातो. त्याचे वाईट वाटते. कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात घालून सेवा देत आहोत. नागरिकांनी डॉक्टरांप्रती सहानुभूती दाखवायला हवी.
- आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय
घरच्यांची धाकधूक वाढली -
माझी पत्नी आरोग्य अधिकारी म्हणून या कोरोना युद्धात सेवा बजावत आहे. कोरोनाचे स्वरूप अधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे आम्हालाही भीती वाटते. मात्र, कोरोना विरुद्धच्या लढ्यात पत्नी सहभागी असल्याचा अभिमान आहे.
- डॉ. राहुल शिरोळे, धुळे
याआधी आरोग्य कर्मचाऱ्यांना काही दिवस विलगीकरणात राहावे लागायचे. त्यानंतर ते ड्युटीवर जायचे. मात्र, आता सलग ड्युटी आहे. काही दिवस सुटी द्यायला पाहिजे.
- कुटुंबप्रमुख, धुळे
मनुष्यबळाची कमतरता -
रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच विलगीकरण करण्याबाबत शासनाच्या कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे विलगीकरण बंद केले आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले तर आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल.
डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.