धुळे/शिरपूर : शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान आणि सड्यापाडा भागात गांजाची झाडे आणि सुका गांजा असल्याची माहिती मिळताच छापा टाकण्यात आला़ त्यात १६९़५ किलो वजनाचा ६ लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा ओला आणि सुका गांजा जप्त करण्यात आला़ दरम्यान, शेत मालक हा फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ शिरपूर तालुक्यातील सड्यापाडा, लाकड्या हनुमान या गावातील एका शेतात मानवी मेंदूवर परिणाम करणारे गांजाचे झाडे, सुका गांजा आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ त्यानुसार, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उमेश बोरसे, उपनिरीक्षक हनुमान उगले, नरेंद्र खैरनार, दीपक वारे, हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पवार, राहुल सानप, रविकिरण राठोड, विशाल पाटील, योगेश दाभाडे, केतन पाटील यांच्या पथकाने छापा टाकला़ सदरहू गावातील एका शेतात सफेद कपड्यावर सुका गांजा पडलेल्या स्थितीत दिसून आला़ समोरच असलेल्या जागेवर कापूस आणि तूरच्या शेतामध्ये झाडांच्या अडोश्याला गांजाचे झाड लावलेले होते़ हे शेत बिला रविंद्र पाडवी (रा़ लाकड्या हनुमान ता़ शिरपूर) याचे असल्याचे पोलीस तपासातून समोर आले़ शेतमालक फरार झाला आहे़ ११६़५० किलो वजनाचा ५ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचा सुका गांजा आणि ५३ किलो वजनाचा ५३ हजार रुपये किंमतीचा ओला गांजा असा एकूण १६९़५० किलो वजनाचा ६ लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे़ याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, गेल्या दोन दिवसांपुर्वीच याच तालुक्यातून पोलिसांनी गांजाची पिके जप्त केली होती़ लागोपाठ दुसरी कारवाई झालेली आहे़
६ लाख ३५ हजारांचा ओला,सुका गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:58 IST