महापालिकेने शहरातील सर्वात मोठ्या टॉवर उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. काही महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. त्यामुळे हे उद्यान असून नसल्यासारखे आहे. दुसरीकडे महापालिकेतर्फे पांझरा नदीकाठावर नकाणे रस्त्याला लागून नवीन उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. शासकीय ग्रंथालयासमोरील जागेत हे उद्यान तयार केले जात आहे. सुमारे अडीच एकर जागेत उद्यानाची उभारणी हाेत आहे. या उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात येतील. तसेच कृत्रिम धबधबा, मेडिटेशन सेंटर, ॲम्पी थिएटर करण्यात येत आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. या उद्यानाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. आत्तापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या उद्यानाच्या कामावर सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. टॉवर उद्यानानंतर शहरातील हे सर्वात मोठे उद्यान असेल. हे उद्यान मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, अद्याप सुरू झालेले नाही. या उद्यानाची प्रतीक्षा धुळेकरांकडून केली जात आहे.
पांझरा नदीकाठावरील उद्यानाची करावी लागतेय प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST