येथील महापालिकेच्या सभागृहात उपमहापौर भगवान गवळी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी उपायुक्त शांताराम गोसावी, सहायक आयुक्त विनायक कोते, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात, उपसभापती शकुंतला जाधव, नगरसेवक सुनील बैसाणे, हिरामण गवळी, नरेश चौधरी, भारती माळी, साबीर शेख, युवराज पाटील, हर्षकुमार रेलन आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाचे अधिकारी, मलेरिया विभागाचे अधिकारी देखील हजर होते.
बैठकीत, मनपा अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर नगरसेवकांनी चांगलेच ताशेरे ओढले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाकडून करण्यात येणाऱ्या योजना तोकड्या ठरत आहेत. परिणामी नागरिकांना वैद्यकीय खर्चाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आग्रा रोडवगळता कुठेही घंटागाडी फिरत नाही. कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. दुर्गंधी पसरली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नागरिकांकडून नगरसेवकांना जाब विचारला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ठोस उपाययोजना करता येत नसतील तर डेंग्यू रुग्णाचा वैद्यकीय खर्च महापालिकेने उचलावा, अशी सूचना सदस्यांनी केली.
बैठकीत सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. फाॅगिंगसाठी किती कर्मचारी आहेत, किती गाड्या आहेत, औषध टाकण्यासाठी किती कर्मचारी आहेत, शहरात एकूण डेंग्यूचे रुग्ण किती, डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत का, घंटागाडी किती सुरू, किती बंद असे विविध प्रकारचे प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ठेकेदारावर कायम आगपाखड होत असताना ते कोणत्याही बैठकीत दिसत नाहीत. त्यांना बोलावले जात नाही. त्यांच्या गावात अथवा त्यांच्या घरी बैठक घेण्याची वेळ आली आहे. ते जुमानत नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाका.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उपमहापौर भगवान गवळी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.