मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहरानजीक लळिंग किल्ला परिसरातील लांडोर बंगला भागात दरवर्षी ३१ जुलै रोजी भीमस्मृती यात्रा आणि मेळावा होत असतो. यानिमित्त रक्तदान शिबिर, सभा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये २८ जूनपासून पुढील आदेश येईपावेतो भादंवि कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू केलेला आहे. यामुळे यंदाच्या भीमस्मृती यात्रेसह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, अशी माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी दिली. या निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी सकाळी माेहाडी पोलीस ठाण्यात दलित नेत्यांसह पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह एम.जी. धिवरे, शंकर खरात, शशिकांत वाघ, प्रेम अहिरे, नयना दामोदर, अंजना चव्हाण, रविकांत वाघ, हरिश्चंद्र लोंढे, राज चव्हाण, रवि चव्हाण, विशाल पगारे, रत्नशील सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, कोरोना महामारीमुळे ३१ जुलै रोजी लांडोर बंगला परिसरात भीमस्मृती यात्रा व मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. यामुळे धुळेसह जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अन्य जिल्ह्यांतील आंबेडकरप्रेमींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना लळिंग येथील लांडोर बंगला आणि वनपरिसरात दर्शनासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पिंगळे यांनी केले आहे.