जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कोरोना काळातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी (प्राथ.विभाग), जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यात सीईओंनी विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
कोरोना काळातील मृत्युपश्चात पेंशन आनुषंगिक बाबी तालुका प्रमुखांनी कालमर्यादेत प्रस्ताव पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयास पाठवावेत, ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कोविड काळातील कोरोना ड्युटीवर असताना, मृत्युमुखी झालेल्या कर्मचार्यांचे ५० लाख विम्यासाठीचे प्रस्ताव शासन निर्णयाप्रमाणे पूर्तता करून जिल्हाधिकारी कमिटीसमोर सादर करून पाठविले जातील. १० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्या डीसीपीएसधारक शिक्षकांचे १० लाख सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव संबंधित कुटुंबीयांना/वारसदारांना संपर्क करून, तालुका स्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांनी मागवून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले.
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीबाबत वर्षातून दोनदा बैठका येणार्या काळात घेण्याचे सांगितले. सर्व तालुक्यांतून माहिती मागवून विषय शिक्षक, मुख्याध्यापक, विस्ताराधिकारी पदे याबाबत लवकरच निर्णय घेऊन, पदोन्नती प्रक्रिया मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनिष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संतोष नवले गटशिक्षणाधिकारी- एस.जी.निर्मल, डाॅ.सी.के.पाटील, सुरेखा देवरे विस्ताराधिकारी गेंदीलाल साळुंखे उपस्थित होते, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग)चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, रूपेश जैन, गिरीश बागुल, नरेंद्र पाटील, गणेश वाघ, मुरलीधर नानकर, संदीप नेरे, विनोद भामरे, देविदास निळे उपस्थित होते.