पिंपळनेर - येथील राजे छत्रपती मार्शल आर्टस् इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन अपर तहसीलदार विनायक थविल व प्रा. प्रशांत कोतकर यांच्या हस्ते झाले.
नेहरू युवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व हिंदुस्तानी स्पोर्ट ॲण्ड ज्युदो कराटे असोसिएशन संचलित राजे छत्रपती मार्शल आर्टस् इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा सप्ताहानिमित्त १९ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक मेहेवाल, जिल्हा क्रीडाधिकारी आत्माराम बोथीकर, व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप साळुंखे, राजे छत्रपती इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे चेअरमन संभाजी अहिरराव, सचिन पाटील, बावा बाविस्कर, रा. ना. पाटील, जगदीश ओझरकर, रमेश बागुल, आबाजी बहिरम, अभय महाले, मुख्याध्यापिका सोनाली पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ‘स्वामी विवेकानंद महानायक’ या विषयावर प्रा. प्रशांत कोतकर यांचे व्याख्यान झाले. अपर तहसीलदार विनायक थविल यांनी ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ याविषयी माहिती दिली. युवा सप्ताहादरम्यान महिलांसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण, कबड्डी, व्हॉलिबॉल, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, तायक्वाँदो, कराटे, संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.