धुळे- धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम व इतर क्षेत्रातील कामगारांची नोंदणी होऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी धुळे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात विविध पदांची भरती करण्याची मागणी आ.कुणाल पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. रिक्त पदांच्या भरतीमुळे कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेला गती मिळणार असल्याची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच विविध क्षेत्रातही कामगार संख्या मोठ्या प्रमाणात आहे;मात्र जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने या संपूर्ण कामगारांची नोंद झाली नाही. त्यामुळे दुर्दैवाने होणारे अपघात, कोरोनासह इतर आजार, पाल्यांना शैक्षणिक सुविधा यांच्यासह कामगार विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून हे कामगार वंचित राहत आहेत. त्यामुळे कामगार कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील कामगारांची नोंद होऊन विविध योजनांचा लाभ त्यांना देता येईल.धुळे जिल्हा कामगार कार्यालयात सरकारी कामगार अधिकारी, माथाडी सचिव, किमान वेतन निरीक्षक, दुकाने निरीक्षक, लिपिक टंकलेखक, शिपाई अशी एकूण २२ पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यासाठी आदेश व्हावेत अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली आहे.