लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊन काळात प्राणी मित्र हे प्राण्यांना वाचण्यासाठी पुढे आले आहेत. शहरातील नेचर कंजर्वेशन फोरम या प्राणीमित्र संस्थेकडून लॉकडाऊन काळात विविध वन्यप्राण्यांना जीवदान देण्यात आले आहे. यात विविध प्रकारचे साप, पक्षी व वन्य प्राण्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरासह तालुक्यातील प्राणीमित्र दिवस-रात्र प्राण्यांसाठी काम करीत आहेत़ या काळात नेचर कंजर्वेशन फोरमचे योगेश वारुडे, प्रदीप जाधव, राहुल कुंभार, महेश करंकाळ, गिरीश सोनवणे, अभिजीत पाटील आदी प्राणी मित्रांनी धामण, दिवड, नाग, गवत्या तस्कर, मांजऱ्या, घोणस आधी विषारी व बिनविषारी प्रकारचे तब्बल ७२ साप सुरक्षित पकडून निसर्गात सोडले आहेत. तसेच मानववस्तीत आढळलेले २ कासव, २ घोरपड वाचवले आहेत.उन्हामुळे अशक्त झालेले खंड्या, बुलबुल, गायबगळा व कोकीळ आदी पक्षांना व कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका काळवीटाला या प्राणीमित्रांनी जीवदान दिलेले आहे. तसेच लॉकडाऊन काळामध्ये शांतता असल्यामुळे करवंद व टेंबे गावानजीक हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर आढळला होता़ त्यावेळी वनविभागासोबत नेचर कंजर्वेशन फोरमच्या प्राणी मित्रांनी गावागावात जाऊन प्रबोधन केले. तसेच पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ६ मांडूळ साप मिळाले़ त्या जप्त केलेल्या मांडूळांची संस्थेच्या प्राणीमित्रांनी २ दिवस काळजी घेऊन पोलिसांसमक्ष निसर्ग सान्निध्यात सोडले. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यात संस्थेच्या प्राणी मित्रांनी किती प्राणी रस्ता अपघातात मरण पावतात याच्याही नोंदी घेतल्या. यात १७ साप, २ पक्षी, १ उदमांजर मृत्युमुखी पडलेले आढळले. नेचर कंजर्वेशन फोरमचे शिंदखेडा तालुक्यातील प्राणीमित्र राहुल गिरासे, हर्षल सिसोदिया, यशपाल राजपूत, प्रतीक चौधरी आदींना सहसा न आढळणारे चित्रांग नायकूळ व स्मूथ स्नेक हे साप तसेच एक जखमी पोपट आढळून आला. शिंदखेडा वनपरिक्षेत्रात एक चिंकारा हरीण रस्ता अपघातात मरण पावले असून एका काळविटाला वाचवण्यात यश आले आहे. या सर्व कामात प्राणी मित्रांना वनविभागाचे तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी उमेश बारी यांचे सहकार्य लाभत आहे. अशा कठीण काळात जीवावर उदार होऊन प्राणी मित्रांनी केलेल्या नि:स्वार्थ सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लॉकडाऊनमध्ये वनप्राण्यांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:24 IST