धुळे : चाळीसगाव रोड चौफुलीवर दोन महिला सोने विक्रीच्या उद्देशाने उभ्या असताना पोलिसांना पाहून पळू लागल्या. पाेलिसांनीदेखील त्यांचा सिनेस्टार्ईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची दोन मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली. पकडण्यात आलेल्या दोन महिला या चाळीसगाव येथील असून धुळ्यातील बसस्थानकात त्यांनी चोरी केली असल्याचे चौकशीतून समाेर आले.
शहरातील चाळीसगाव चौफुलीवर दोन महिला सोन्याचे दागिने विकण्यासाठी आल्या असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक योगेश राऊत आणि योगेश ढिकले यांना दोन महिला पोलिसांना घेऊन साध्या वेशात सापळा लावून पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, पथकाने चाळीसगाव चौफुलीवर जाऊन त्या महिलांना शोधले. पोलिसांना पाहताच त्या दोघी पळून जाऊ लागल्या. परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. महिला पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. दोघींकडे एक एक सोन्याची पोत मिळून आली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी करण्यात आली. त्यात मालाबाई जितेंद्र जेठे (४५, रा. इंदिरा नगर, चाळीसगाव) ही महिला हिस्ट्री सिटर असून तिने यापूर्वी धुळ्यातील बसस्थानकावर चोऱ्या केल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिच्या सोबत असलेली माया दीपक कसबे (२३, रा. इंदिरा नगर, चाळीसगाव) हिनेदेखील धुळे बसस्थानकात जानेवारीपासून ३ ते ४ चोऱ्या केल्याचे मान्य केले. दोघींच्या ताब्यातून ३५ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसूत्रे असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत पुढील तपास धुळे शहर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली योगेश राऊत, याेगेश ढिकले, अजीज शेख, हेमंत पवार, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे, चेतन झोळेकर, स्वप्निल सोनवणे, मुन्नी तडवी, जयश्री मोरे यांनी केली.