धुळे : आमच्याकडे एक किलो सोने असून ते कमी भावात देण्यास तयार आहोत असे आमिष दाखवून मुंबई येथील दोघांना साक्री तालुक्यातील जामदा शिवारात बोलावून घेतले. दोघे येताच तिघांनी जबरीने पैसे व सोन्याच्या वस्तू काढून घेत लूट केल्याची घटना साक्री तालुक्यातील जामदा शिवारात शनिवारी घडली.
सोने कमी भावात घेण्याच्या उद्देशाने वरळी मुंबई येथून राजीव कृष्णकांत कांदळकर, इंद्रजित मोहन बिराले हे दोघे आले होते. त्यांना अगोदर विश्वासात घेण्यात आले आणि सोने मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर जाणाऱ्या या दोघांना संशयित आरोपींनी दमदाटी करुन अडवून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करण्यात आली. दोघांकडे असलेली रोख रक्कम, सोन्याची अंगठी, मोबाईल असा एकूण १ लाख ५८ हजाराचा ऐवज लुटून संशयित आरोपी फरार झाले. दरम्यान सोने घेण्यासाठी आलेले दोघांनी जखमी अवस्थेतच निजमापूर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पहाटे साडेचार वाजता राजीव कृष्णकांत कांदळकर (५२) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अरुण नामक व्यक्तीसह त्याच्या सोबत असलेले दोन अशा तिघांविरूध्द भादंवि कलम ३९२, ३२३, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे घटनेचा तपास करीत आहेत.