दोंडाईचा : शेतातून चोरट्यांनी चोरी केलेली मोटर सायकल ताब्यात देण्यासाठी धमकी देऊन आॅनलाईन २००० हजार रुपयाची वसुली केल्या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात पाच जणांविरुद्ध चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोंडाईचा पासून जवळच असलेल्या रामी गावातील अनिल हिम्मत माळी हे रविवारी रामी शिवारात मोटर सायकलवर कामाला गेले होते. त्यांची मोटर सायकल ( क्र.एमएच १८-अेएच ५७१४) ही चोरट्यानी चोरून नेली. त्यांना एका मोबाईल फोन आला. चोरट्याने तुमची मोटर सायकल माझ्या घरासमोर लावली असल्याचे सांगून मी तुमची मोटर सायकल आणून देतो. मोटर सायकल पाहिजे असेल तर फोन पे वर २ हजार रुपये टाक, नाहीतर तुझी मोटर सायकल परत न मिळता मोडून टाकली जाईल, तुला ब्लेड मारले जाईल अशी धमकी दिली.आरोपी सोहेल अमीन पिंजारी व रितिक भिडे यांनी अनिल माळी यांना नंदुरबार चौफुलीस बोलावून घेतले. सोहेल पिंजारीचा फोनवर आॅनलाईन २ हजार रुपये ट्रान्स्फर केल्यानंतर चोरट्यांनी केशरानंद पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल दिली. मोटर सायकल चोरून धमकी देऊन आॅनलाईन २ हजार रुपयाची वसुली केल्या प्रकरणी संशयित आरोपी रितीक भिडे, सोहेल अमीन पिंजारी, समीर नाजीम पिंजारी, फैजान निसार पिंजारी असरार सलीम शेख या विरोधात दोडाईचा पोलिसात चोरी, धमकी, त्रास ३७९, ३८४ ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे तपास करीत आहेत. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
धमकी देवून दोन हजाराची केली आॅनलाइन वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:55 IST