धुळे : देवपुरातील दैठणकर नगरात गुरुवारी भरदुपारी दोन गटात हाणामारी झाली. त्यात तलवारीसह चाकू आणि लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आला. यावेळी पाच जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. दरम्यान, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हा दाखल होताच दोघांना अटक करण्यात आली.एका गटाकडून वसंत भावराव अहिरे (५५, रा. इंदिरा नगर, वाडीभोकर रोड) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील जुनवणे येथे ९ डिसेंबर रोजी रात्री लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन अशोक वसंत मोरे, सोमनाथ वसंत मोरे, राजू गोरख पारवे (रा. दैठणकर नगर) व यशवंत बागुल या चौघांनी त्यांना गुरुवारी दुपारी दैठणकर नगरात गाठले. वसंत अहिरे यांच्या डोक्यात तलवार मारुन त्यांना जखमी करण्यात आले. भांडणाचा आवाज ऐकून अहिरे यांचा मुलगा संदीप व पुतण्या राहुल हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना चौघांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात हे दोघे जखमी झाले. त्यावरुन या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे करीत आहेत.दुसऱ्या गटाकडून भैय्या उर्फ राजू गोरख पारवे (रा. दैठणकर नगर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मागील भांडणाच्या कारणावरुन वसंत भावराव अहिरे, सागर वसंत अहिरे, अक्षय वसंत अहिरे, संदीप वसंत अहिरे, राहुल वसंत अहिरे यांनी राजू पारवे, यशवंत बागुल यांना मारहाण केली. राजूच्या पोटात चाकूने वार केल्याने गंभीर दुखापत केली. तलवारीने पायाच्या मांडीवर, डोळ्यावर, पाटीवर वार करुन जखमी केले. यशवंत बागुल यांच्यावर देखील तलवारीने वार करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी सागर अहिरे, अक्षय अहिरे यांना ताब्यात घेतले आहे.
धुळ्यातील देवपुरात दोन गटात तुंबळ हाणामारी, ९ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 22:08 IST