धुळे : भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर 5 व 6 डिसेंबर 2020 या दोन्ही दिवशी धुळे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, 25 जोनवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. तत्पूर्वी मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करावी, अशा पध्दतीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदार यादीत 18 ते 19 वर्षे वयोगटातील नवीन नोंदणी झालेल्या मतदारांच्या छायाचित्र मतदार ओळखपत्राची छपाई करुन त्यांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी मतदार ओळखपत्राचे वाटप करता येईल.या कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून 15 डिसेंबर 2020 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार नोंदणी संबंधित विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दोन शनिवार आणि दोन रविवारी धुळे जिल्ह्यातील सर्व पाचही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी सुध्दा विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येईल.या विशेष मोहिमेनिमित्त इछड संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहतील. जिल्ह्यातील मतदारांचे मतदार यादीमधील नाव, नातेवाईकाचे नाव व प्रकार, लिंग, वय, जन्म दिनांक व पत्ता इ. माहितीची दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे, त्यांनी दुरुस्तीकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावीत व दुरुस्तीचा अर्ज क्रमांक 8 भरुन आवश्यक ते बदल करुन घ्यावेत.तसेच जिल्ह्यातील ज्या पात्र नागरिकांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरिक व नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इछड) यांच्याकडे सादर करुन नावाची नोंदणी करण्याबाबतचा अर्ज क्रमांक सहा भरुन घ्यावेत. या मोहिमेच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील सर्व मतदार, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संघटनांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या मोहिमेस सहाकर्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.
मतदार नोंदणीसाठी आजपासून दोन दिवस विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 22:02 IST