निवेदनात म्हटले आहे की, संघटना निवडणूक कामासाठी नियमित मदत करीत असते. मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे सन २०२०-२१ या वर्षाच्या परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार परीक्षेचे मूल्यमापनाचे काम ७ ते २१ जुलैपर्यंत पूर्ण करायचे आहे. याच दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होत असून, शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक अस्वस्थ झाले आहे. मूल्यमापनाचे काम हे सातत्याने चालणारे असून, राज्य मंडळाने दिलेल्या मुदतीत करायचे आहे. यासाठी विविध प्रकारची कार्यवाही करावी लागणार आहे.
यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कामात ५-६ दिवस खर्च करावे लागल्यास मूल्यमापन प्रक्रिया व निकाल वेळेत तयार करण्यावर परिणाम होणार आहे. मानसिक तणाव व कमी वेळेत निर्दोष मूल्यमापनावर परिणाम होऊ शकतो. मूल्यमापनाची कार्यवाही शिक्षकांव्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या कामातून बारावी परीक्षेचे मूल्यमापन करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शिक्षण मंडळाच्या कामासाठी मुक्त करण्यात यावे. निवेदनावर संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा. बी.ए. पाटील यांची स्वाक्षरी आहे. यावेळी प्रा. डी.पी. पाटील, प्रा. आर.जे. पवार, प्रा. एम. एम. बुवा, प्रा. बी.एम.जावरे, प्रा. व्ही.डी. चौधरी, प्रा. एस.सी.बैसाणे उपस्थित होते.