जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत विशेष पंधरवडा राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात गावपातळीवर कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात तालुका, जिल्हा व गाव पातळीवरील यंत्रणेचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. हे आराखडे तयार करण्यासाठी पाणी व स्वच्छता मिशन आणि युनिसेफतर्फे कोबो कलेक्ट या मुक्त स्रोत पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. त्याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने जिल्हा, तालुका, गाव पातळीवर प्रशिक्षण सुरू आहे. त्यानुसार धुळे व शिंदखेडा तालुक्याचे २८ जुलैला तर शिरपूर व साक्री तालुक्याचे २९ जुलै रोजी ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार, उपअभियंता संजय येवले, अजय पाटील, वैभव सयाजी, दीपक देसले, संतोष नेरकर, अरुण महाजन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात कृती आराखड्याची माहिती भरताना काय काळजी घ्यावी, संपूर्ण प्रक्रिया, ग्रामस्थांचे योगदान आदींची माहिती देण्यात आली. त्यानंतर आता १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गावस्तरावरून माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ४ ऑगस्टला जिल्हास्तरावर माहितीचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान आराखड्याची पडताळणी होऊन १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत वाचन आणि मंजुरी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील दीपक पाटील, विजय हेलिंगराव, प्रशांत देव, मनोज जगताप, संगीता ओझा, जीवन शिंदे यांनी प्रयत्न केले.
जलजीवन मिशनचा कृती आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसेवकांना दिले प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:33 IST