धुळे : २०१९ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षेच्यावेळी डमी उमेदवार बसवून फसवणूक केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात बुधवारी दोन जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याप्रकरणी अहमदनगर तहसीलदार माधुरी आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. १९ जुलै २०१९ रोजी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची इंग्लिश प्रायमरी रेसिडेन्सिअल स्कूलमध्ये तलाठी भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यावेळी विक्की निंबाजी खरात (२६, रा. सागरवाडी, ता. बदनापूर जि. जालना) या उमेदवाराच्या नावाने डमी उमेदवार बसविण्यात आला होता. विक्की खरात याने अर्ज करताना अपलोड केलेला फोटो, ऑनलाइन अपलोड केलेल्या अर्जावरील स्वाक्षरी या परीक्षा केंद्रावर हजेरीपटावरील स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचे कागदपत्र पडताळणीदरम्यान निदर्शनास आले. तसेच तलाठी पदभरती २०१९ च्या अनुषंगाने महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेमध्ये विक्की खरात याने त्याच्या जागी ताेतया इसमास बसवून शासनाची फसवणूक केली आहे. चौकशीतून ही बाब उघड झाल्याने त्याच्याविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तलाठी भरती परीक्षेत तोतयागिरी, जालन्याच्या तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:14 IST