धुळे : जिल्ह्यातील आणखी १८ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले व तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मागील दोन महिन्यांपासून मृतकांची संख्या घटली होती. मात्र एकाच दिवशी तीन रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये, धुळे तालुक्यातील फागणे येथील ६५ वर्षीय महिला, धुळे शहरातील केले नगर येथील ६४ वर्षीय पुरुष व वाडीभोकर रोड परिसरातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.या बाधित रुग्णांवर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ३८४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.५ दिवसातच ५जणांचा मृत्यू -डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील पाच दिवसातच सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.१ ते ७ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता. तसेच आढळणाऱ्या बाधित रुग्णांचेही प्रमाण घटले होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. ८ डिसेंबर रोजी धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाच येथील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर ११ डिसेंबर रोजी शांती नगर परिसरातील ६५ वर्षीय महिलेचा हिरे महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.नोव्हेंबरमध्ये पाच मृत्यू -नोव्हेंबर महिन्यात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील पाच दिवसातच पाच मृत्यू झाले आहेत.दिवाळीमुळे वाढलेल्या गर्दीमुळे रुग्ण वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली होती. रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र मृतांचा आकडा वाढला आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय येथील १९० अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. मनपा कोविड केंद्रातील रॅपिड अँटीजन टेस्टचे ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय महाविद्यालयातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. एसीपीएम प्रयोग शाळेतील १ व खाजगी प्रयोगशाळेतील पाच अहवाल पॉझिटिव्ह आले.कोरोनाचा प्रादुर्भाव अजुन संपलेला नाही. आपली बेफिकीरी व निष्काळ जीपणा कुणाच्या मृत्यूला किंवा संसर्गाला कारण ठरू शकते. बाधित रूग्णांची संख्या जास्त दिसत नसली तरी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्यांमुळे संख्या वाढू शकते.-डॉ.विशाल पाटील,नोडल अधिकारी
एकाच दिवसात तीन कोरोना बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:13 IST