धुळे : येथील देवपूर परिसरातील दहशत माजविणाऱ्या रामेश्वर मैकुलाल चित्ते कुटुंबांचा आणि गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देवपुरातील विष्णूनगर, चंदननगर, नेहरूनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या भागातील नागरिकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर कुटुंबातील तरुण मुले, त्यांच्याकडे असलेले गुंड प्रवृत्तीचे तरुण यांच्यामार्फत संपूर्ण परिसरात नेहमी गुंडगिरी करून, दहशत निर्माण करून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी (दि. १२) रात्री बबलू भारत बर्वे आणि अजय भारत बर्वे या भावंडांवर तलवारी, कोयता, लोखंडी राॅड, काठ्यांच्या साहाय्याने २० ते २५ महिला-पुरुषांच्या जमावाने प्राणघातक हल्ला चढविला. घरावर दगडफेक केली. वयोवृद्ध आईला मारहाण करून विनयभंग, छेडछाड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. परिसरामध्ये महिला तसेच तरुण मुलींची छेड काढली जाते. या कुटुंबावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. दगडू शिंदे याचा खून झाला होता. या कुटुंबाने गुंड प्रवृत्तीची टोळी तयार केली आहे. तिचा बंदोबस्त करून परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर रवींद्र पन्नालाल चत्रे, सागर कैलास कुरील, सोनू रमेश कुरील, पंकज संतोष केसावलेकर, संजय बारकू बर्वे, अजय देविदास चत्रे, पारस ठाकूर, बलराम पानसे, राजेंद्र निकम, हर्षल शिंदे, ललित चत्रे, हर्षल कुरील, प्रकाश महाजन, फिरोज सय्यद, योगेश चत्रे, दाजमल गायकवाड, अशोक मोरे, प्रवीण परदेशी, जगदीश पानसे, मनोज कढरे यांच्यासह परिसरातील तब्बल १६२ नागरिकांच्या सह्या आहेत.