धुळे : साक्री तालुक्यातील अंबापूर शिवारात महामार्गालगत वन जमिनीवर अतिक्रमण करुन हाॅटेलच्या नावाखाली अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नुकतीच निदर्शने केली.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबापूर येथे गट क्रमांक २८/१ आणि २८/२ या महामार्गालगतच्या वन जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या कब्जा करुन बेकायदेशीररित्या हाॅटेल सुरु केले आहे. याठिकाणी मद्यविक्री तसेच इतर अवैध व्यवसाय सर्रासपणे चालतात. अवैध धंदे करणारे व्यक्ती अतिशय आडदांड आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्ती त्यांना बोलण्यासाठी धजावत नाही. वन विभाग आणि महसूल प्रशासन देखील कोणतीही कारवाई करीत नाही. याउलट मेंढ्या चारुन उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब मेंढपाळांवर मात्र खोटे गुन्हे दाखल केले जातात. परंतु वन जमिनीवर थेट अतिक्रमण करुन अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे. याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
हाॅटेलच्या नावाखाली अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST