धुळे : येथील शहर पोलीस ठाण्यात दाखल ॲक्ट्राॅसिटीच्या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक मांडलेकर हे तपास अधिकारी गुन्ह्यातील संशयितांबाबत नरमाईची भूमिका घेत असून विशेष न्यायालयात पत्र देऊन अटक टाळण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. तसेच या गुन्ह्याचा तपास जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे. ॲक्ट्राॅसिटीच्या गुन्ह्यातील पीडितावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज भगवान चाैधरी यांनी जाती व्देषापोटी कार्यालयीन हक्कापासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने बँकेचे कर्मचारी नरेश त्र्यंबक गांगुर्डे (५१, रा. सिंहस्थनगर, साक्री रोड, धुळे) यांची चाैकशी लावली आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता गांगुर्डे यांना ११ जून रोजी सकाळी १० वाजता जातिवाचक शिवीगाळ आणि दमदाटी करीत सार्वजनिक ठिकाणी अपमान केला. याप्रकरणी गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून चाैधरी यांच्या विरोधात २० जून रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा होत असून बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि योग्य प्रामाणिक अधिकाऱ्याकडे गुन्ह्याचा तपासा द्यावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने निवेदनात केली आहे. त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, शहर महासचिव ॲड. सतीश अहिरे, जिल्हा सचिव विजय भामरे, शहर कोषाध्यक्ष ईश्वर जाधव, शहराध्यक्ष ॲड. संदीप जावरे, शिंदखेडा शहराध्यक्ष मिलिंद पाटोळे, शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष संतोष इंदवे, पंकज साळवे, अजय बागुल, संगम बागुल, अजय गायकवाड, वाल्मीक गोपाल, सतीश थोरात, गणेश बाशिंग, आनंद आल्हाट, विकी विशाल शिरसाठ, बाळा साळवे आदींनी दिला आहे.
ॲक्ट्राॅसिटी गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST