धुळे : तालुक्यातील दिवाणमळा शिवारात बारकू पोपट बागुल (१८, रा. वरची भिलाटी, दिवाणमळा ता. धुळे) याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मानसिंग रतन बागुल यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बारकू बागुल याने घरात मोबाइल चार्जिंग लावून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. तो वेळीच परत न आल्याने घरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या जवळच पळसाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपविले असल्याचे काहींना दिसून आले. ही घटना लक्षात येताच आरडाओरड करण्यात आली. गावातील सरपंचांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळेस बारकू बागुल याने कमरेचा पट्टा गळ्यात अडकवून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवाणमळ्यात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 22:03 IST