निजामपूर : येथील पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवघ्या एक दिवसात गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे. सुरुवातीला या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.
साक्री तालुक्यात छावडी येथील शिवाजी अंबर बागुल हे रात्री कीर्तनाला गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे हेरून त्यांच्या घराची मागील खिडकी तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी ६ हजार ७०० रुपयांची दीड ग्रॅमची सोन्याची नथ, ६ हजार ७०० रुपयांच्या कानातील बाळ्या, ४२ हजार रुपयांचे हातातील ६० भार चांदीचे गोठ, ४ हजार रुपये रोख असा ऐवज ठेवलेली लाेखंडी पेटी घेत पोबारा केला होता. ही पेटी फोडून त्यातील वस्तू लंपास करत पेटी नाल्यात फेकून दिली होती. ही चोरीची घटना १३ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी निजामपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच संशयित भरत विनायक अहिरे (३८), उमेश पंडित महाले (३४), संदीप दिलीप सोनवणे (२७) (सर्व रा. छावडी, ता. साक्री) यांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. या तिघांना चोरीला गेलेल्या सर्व मुद्देमालांसह अटक केली असून, चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करुन पोलिसांनी एका दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ, पोलीस कर्मचारी सागर ठाकूर, संदीप गवळी, वसंत गरदरे, प्रमोद कुंभार, अमरसिंग पवार यांनी केली.