धुळे : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंध कितीही कठोर असले तरी ते केवळ नावालाच असल्याचे चित्र आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यापासून पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज ३०० च्या पार जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. परंतु या दरम्यान केवळ दुकाने, बाजारपेठा बंद होत्या. नागरिक मात्र बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरत होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांमध्ये कोणतीही भीती नसल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे गांभीर्य नसल्याने काळजी घेताना खूपच कमी लोक दिसत आहेत. बसस्थानक, हाॅटेल्स, विवाह समारंभ आदी ठिकाणी ५० टक्के उपस्थितीचा नियम पाळला जात नाही.
कोठे काय आढळले
चित्रपटगृहे
कोरोना काळात अटी-शर्तीच्या आधारे चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी असली तरी धुळे शहरात चित्रपटगृहे बंद आहेत. कारण कोरोना नियमानुसार चित्रपटगृहे चालविणे परवडणारे नाही. त्यामुळे नवीन चित्रपट प्रदर्शित होत नाहीत.
विवाह समारंभ
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी विवाह समारंभ मात्र धुमधडाक्यातच होत आहेत. ५० वऱ्हाडींना परवानगी असताना सर्वच नातेवाईक, मित्र परिवार गोळा होत आहे. गर्दी आहे, मास्कचा वापर नाही. कोरोना नियमांचे पालन होत नाही.
अंत्यविधी
कोरोनाच्या भीतीमुळे अंत्यविधीला फारशी गर्दी नसते. तरीदेखील जवळचे नातेवाईक आणि परिसरातील लोक मिळून अंत्ययात्रेतील संख्या ५० च्या पुढेच असते. अंत्ययात्रेत मात्र कोरोना नियमांचे काटेकोर पालन होते. मास्क वापरतात.
कार्यालये
कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे. काहीजण नियमित मास्क वापरतात तर काहीजण अधूनमधून मास्क वापरताना दिसतात. सॅनिटायझरचा वापरही होत आहे. सध्या ५० टक्के उपस्थिती आहे.
गृह विलगीकरण
गेल्या वर्षभरापासून गृह विलगीकरण हा प्रकार केवळ नावालाच आहे. सुरुवातीला हातावर शिक्का असलेले लोक बाहेर फिरायचे. आता गृह विलगीकरणात असलेले फिरतच आहेत. त्याच्या घराबाहेर बोर्ड नाही.
पहिल्या दिवशी एकही कारवाई नाही
१५ दिवसांंसाठी कठोर निर्बंध लागू केल्याच्या पहिल्या दिवशी एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.