महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने एस.टी.मध्ये अत्याधुनिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे खासगी बसगाड्यांशी स्पर्धा होऊ लागली. दरम्यान, प्रवाशांसाठी इंटरनेट वायफायचा प्रयोगही करण्यात आला. परंतु तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. महामंडळाने खासगीप्रमाणेच आता स्लीपर कोच सुरू केले आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता प्रवाशांचा वेळ वाचावा, आपली बस नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळावी यासाठी महामंडळाने नवीन सिस्टिम कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे येथेही हा प्रयोग राबविण्यात येत आहे. त्याचे अपडेशन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बसस्थानकात लागले आहेत मोठे स्क्रीन
n प्रवाशांना बसच्या वेळा कळाव्यात, तसेच इतर माहिती मिळावी या उद्देशाने धुळे आगारात तीन व देवपूर बसस्थानकात दोन मोठे स्क्रीन लावण्यात आलेेले आहेत.
n या स्क्रीनवरच बसचे लोकेशन कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
n रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाड्यांची स्थिती मोबाईलवर लागलीच कळत असते. याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. एस.टी.ने अद्याप स्वतंत्र ॲप विकसित केले नसले तरी या स्क्रिनमुळे बसची स्थिती कळू शकणार आहे.
n एस.टी. महामंडळाच्या या सिस्टिमचे स्वागत होत आहे. मात्र महामंडळाने आरक्षणाचीही स्थिती या स्क्रिनवर दाखविण्याची व्यवस्था करावी.
n एस.टी.ची करमणूक सेवा काही महिन्यातच कोलमडली होती, तसे या सिस्टिमबाबत होऊ नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.