लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : दहिवेल बसस्थानक परिसरात असलेल्या एका दुकानातून चोरी गेलेले मोबाईल, लॅपटॉप आणि रिचार्ज व्हाऊचर असा मुद्देमाल साक्री पोलिसांनी शिताफिने पकडला़ याप्रकरणी तपास करत चौघांना पकडण्यात साक्री पोलिसांना यश आले़ साक्री तालुक्यातील दहिवेल गावात बसस्टँड जवळ शेख शकील कमलोद्दीन (३८, रा़ पिंपळनेर) यांचे मोबाईल दुकान आहे़ चोरट्यांनी लोखंडी शटरचे कडीकोंडा तोडून दुकानात विक्री व दुरुस्तीचे ४० मोबाईल, १ लॅपटॉप, पॉवर बँक, रिचार्ज व्हावचर असा ९६ हजार ३८३ रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता़ याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ मोबाईलचे आयएमईआय नंबर वरुन कॉल डिटेल्स काढले असता चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल सुरेश रघुनाथ जगताप (रा़ उंबरखंडवा ता़ साक्री) याच्याकडे आढळला़ चौकशीअंती जयेश मगन साबळे, धनराज सुभाष बहिरम, विशाल चुन्नीलाल बागुल यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले़ न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत कोठडी मिळाली आहे़
दहिवेल येथून चोरलेले मोबाईल, लॅपटॉप हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:42 IST