कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीची सेवा सुरू झाली. एसटीने लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत. धुळे विभागातून गुजरात, मध्य प्रदेशला जाणाऱ्या बसेस भरपूर आहेत. लॅाकडाऊननंतर या बसेस सुरूच झालेल्या नाहीत.
अनलॉकनंतर गुजरात, मध्य प्रदेशच्या बसेस महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातील बसेसही गुजरातला जाऊ लागल्या आहेत. जळगाव विभागानेही गुजरातसाठी बससेवा सुरू केलेली आहे. मात्र, धुळे विभागाला अद्याप आदेश नसल्याने, गुजरात व मध्य प्रदेशसाठी बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. परराज्यांतील बससेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच आहे.
अनेक मार्गांवरील फेऱ्या बंदच
जून महिन्यात अनलॅाक झाल्यानंतर एस.टी. महामंडळातर्फे बससेवा सुरू करण्यात आली.
मात्र, एस. टी. महामंडळाने लांबपल्ल्याच्या बसेस सुरू केलेल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंदच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
पुणे, नाशिक मार्गावर वाढली प्रवाशांची गर्दी
बससेवा सुरू झाल्यानंतर पुणे व नाशिक मार्गावरच प्रवाशांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे औरंगाबादला जाणाऱ्या मार्गावरही काही प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
या भागातून सुरत, इंदूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र, अद्याप परराज्यांतील बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ही बससेवा सुरू होण्याची गरज आहे.
पुन्हा तोटा वाढला
अनलॉकनंतर बससेवा सुरू झालेली असली तरी ती अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. केवळ लांबपल्ल्याच्या बसगाड्याच सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे एस.टी.चा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
प्रवासी आहेत, मात्र बस सुरू झालेली नाही
धुळे जिल्ह्यातून शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेशात जाणारे प्रवासी भरपूर आहेत. मात्र, धुळे विभागातर्फे दोन्ही राज्यात अद्याप बससेवा सुरू झालेली नाही. या दोन्ही राज्यांत बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे.