धुळे : येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियांना सोमवारपासून सुरुवात झाली. शस्त्रक्रिया रखडलेल्या रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे दीर्घकाळापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद होत्या. त्यामुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, सोमवारपासून मोतीबिंदू शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला आहे. बुधवारपर्यंत सहा रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. तसेच पापणीची शस्त्रक्रियादेखील यशस्वीपणे करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले होते. म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियादेखील यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तसेच रुग्णांची संख्या कमी झाल्याने शस्त्रक्रियांना सुरुवात झाली असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.