लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : १४ व्या वित्त आयोगाचा शिल्लक निधी मार्च अखेर खर्च करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी ग्रामसेवकांना दिले़धुळे पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवकांची आढावा बैठक झाली़ बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी, कृषी समिती सभापती रामकृष्ण खलाणे, पंचायत समिती सभापती विजय पाटील, आरोग्य आणि शिक्षण समिती सभापती मंगला पाटील, महिला आणि बालकल्याण समिती सभापती धरती देवरे, पंचायत समितीचे उप सभापती विद्याधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव, आशुतोष पाटील, संग्राम पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए़ जे़ तडवी, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण अधिकारी संजय बागुल यांच्यासह सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते़ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत़ त्यांची भेटही होत नाही़ त्यामुळे विकासकामे अडतात, अशा तक्रारी अनेक सरपंचांनी केल्या आहेत़ सरपंच आणि ग्रामसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे़ गावातील प्रमुखाची अशी गत आहे तर सामान्यांचे काय, असा प्रश्न करीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी सामान्यांची कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या़ मुख्यालयी राहत नसले तरी दोन तास तरी गावात जावून कामे करा़ दाखले मिळविण्यासाठीची आॅनलाईन प्रणाली समजून घ्या आणि नागरीकांना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले़ यापुढे तक्रार आली तर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही त्यांनी दिला़१५ व्या वित्त आयोगाचा निधी पडून आहे़ चौगावला ४८ लाख, आर्वीला ३४ लाख ६३ हजार, कुंडाणे वार येथे ३० लाख, मोघणला २९ लाख, कुसूंबा येथे तब्बल ५५ लाख १९ हजार रुपये, कापडण्याला ४७ लाख रुपये निधी शिल्लक आहे़ या गावांसह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा शिल्लक निधी मार्च अखेर खर्च करुन गावांमध्ये विकासकामे करण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या़ गावात सुविधांची वाणवा असताना निधी पडून राहतो याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़१४ व्या वित्त आयोगाचा निधी त्याच त्या कामांवर दरवर्षी खर्च केला जातो, असा गंभीर आरोप ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए़ जे़ तडवी यांनी केला़ गावातील पाणीपुरवठा स्त्रोतांचा विकास करणे, सौर पंप बसविणे, शुध्द पाण्यासाठी आरओ प्रणाली बसविणे, पाणीपुरवठा पाईपलाईनचा विस्तार करणे, ग्रामपंचायतीसाठी फर्नीचर खरेदी करणे, गावात सौर दिवे लावणे, शाळा, अंगणवाड्या यांसारख्या मालमत्तांची देखभाल दुरूस्ती करणे आदी कामांवर हा निधी खर्च करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन त्यांनी केले़ सोनगीरचे ग्रामसेवक कुवर आढावा बैठकीला गैरहजर होते़ त्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आहेत़ तसेच सोनगीरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पालकत्व देण्याचा निर्णय या बैठकीत झाला़ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला निधी त्यातून प्रस्तावित केलेल्या कामांची यादी सरपंच, जि़ प़, पं़ स़ सदस्य यांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी दिल्या़स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी प्राप्त होवूनही अनेक ग्रामपंचायतींनी अजुनपर्यंत सॅनेटरी नॅपकीन डिस्पोजल मशिन खरेदी केले नसल्याची तक्रार महिला व बालकल्याण समिती सभापती धरती देवरे यांनी केली़ यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला सहा हजार रुपये प्राप्त झाले असून बाजारात वेगवेगळ्या किंमतीचे मशिन उपलब्ध असल्याने अडचणी येत असल्याचा खुलासा ग्रामसेवकांनी केला़ त्यावर ग्रामपंचायत स्तरावर तोडगा काढून त्वरीत मशिन खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले़ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीतून सरपंच किंवा लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या विकासकामांचा प्रस्ताव ग्रामसेवक तयार करुन देत नाहीत़ माझा स्वत:चा तसा अनुभव आहे़ यापुढे लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव तयार करा़ काम झाले नाही आणि निधी परत गेला असे होता कामा नये, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या़ग्रामसेवकांबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ त्यात सुधारणा व्हावी यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलावली आहे़ या बैठकीत केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे़ यापुढे देखील वेळोवेळी बैठक घेतल्या जातील़ त्यात मागील बैठकीतील मुद्यांचा पाठपुरावा केला जाईल़ सुधारणा झाली नाही आणि पुन्हा तक्रारी आल्या तर कठोर कारवाई करण्याचा ईशारा जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला़तसेच कापडणे गावाचा पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या़सरपंच तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे केली जातील़ सर्वसामान्य नागरीकांची कामे अडणार नाहीत अशी हमी ग्रामसेवक संघटनेच्या एका ग्रामसेवकाने दिली़
वित्त आयोगाचा निधी मार्चअखेर खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:17 IST