सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, कर्मचारी विशाल सोनवणे, चालक सुरेश तावडे सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर हाेते. शिरपूरहून धुळ्याच्या दिशेने जाणारे एमपी ०९ सीजी ८२७५ क्रमांकाचे वाहन संशयावरून थांबविण्याचा इशारा पाटील यांनी चालकाला दिला. पण, त्याने दुर्लक्ष करून ते वाहन वेगाने पळविले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन नगावजवळ थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलीस त्या वाहनाजवळ पोहोचल्यानंतर तपासणी केली असता त्यात ४ गुरे आढळून आली. या वाहनाच्या मागील बाजूस एमपी ०९ सीजे ८२७२ असा आढळून आला. वाहनाच्या मागे आणि पुढे दोन वेगवेगळे नंबर लावण्यात आलेले आहेत. गोरक्षकांची मदत घेऊन या गुरांना गोशाळेत पाठविण्यात आले. सोनगीर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
गुरांचा ट्रक पकडण्यासाठी सोनगीर पोलिसांचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST