काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाच्या विविध योजनेतून विकासाची कामे केली जात आहेत. मात्र, निधीअभावी अनेक कामे प्रलंबित असून, काही कामांना नव्याने मंजुरी देणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देत त्यांना निधी मिळावा, म्हणून आ.कुणाल पाटील यांनी थेट विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला. विधानभवनातील आपल्या भाषणात आमदार पाटील यांनी बोरी आणि पांझरा नदीवर पुलांच्या बांधकामाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला. पावसाळ्यात या नद्यांना महापूर येतो, तेव्हा शेतकरी आणि नदीकाठावरील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे पांझरा नदीवर जुने भदाणे ते नवे भदाणेच्या दरम्यान पूल, नेर चंदन टेकडी ते चिंचवार रस्त्यामध्ये पूल, बोरी नदीवरील निमगूळ ते नवे निमगूळ पूल, धामणगाव ते खोरदड दरम्यान पूल, विंचूर ते आदिवासी वस्तीदरम्यान पूल, मांडळ ते कुळथे या दरम्यान बोरी नदीवर पुलाचे बांधकाम होणे आवश्यक आहे. ही कामे त्वरित मंजूर करून निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. तालुक्यातील रस्ते राज्य निधीतून प्रस्तावित करण्यात आली असल्याने, अद्याप त्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली नाही, तसेच रस्ते दुरुस्ती व विकास ३०-५४ अंतर्गत एकही काम धुळे तालुक्यात मंजूर झालेले नाही. त्यामुळे धुळे ग्रामीणमध्ये रस्ते विकासाला गती देण्यासाठी ही कामे मंजूर करण्याचीही मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.
रस्ते, पूल, विजेचे प्रश्न सोडवा- आमदार पाटील यांची विधानसभेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST