रबी हंगामामुळे गहू, हरभरा, दादर, मका या भुसार शेतमालाची आवक येथील मार्केटला मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ विशेषत: चोपडा, अमळनेर, शिंदखेडा आदी तालुक्यांतील शेतकरी देखील याठिकाणी शेतमालाला अधिक भाव मिळत असल्यामुळे विक्रीला येत आहेत़ तसेच उन्हाळी भुईमूग शेंगांची देखील आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे़ त्यामुळे येथील मार्केट आवारात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते़
शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल-मापाडी आदी मिळून बाजार समितीच्या आवारात सतत गर्दी असते़ अशावेळी वाढणाऱ्या या गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्यास भीती वाटते़ त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येत्या १७ मेपासून एक दिवशी भुसार तर दुसऱ्या दिवशी भुईमूग शेंगा यांचे लिलाव करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी एक दिवस भुसार व दुसऱ्या दिवशी शेंगा याप्रमाणे आपला शेतमाल विक्रीस आणावा़ भुसार खरेदीच्या दिवशी शेंगांची खरेदी केली जाणार नाही अथवा शेंगा खरेदीच्या दिवशी भुसार शेतमाल खरेदी केला जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी व संचालक मंडळाने केले आहे़