धुळे : नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या धुळ्यातील एका कुटूंबाचा कलह विकोपाला गेला असून घर सोडून जावे यासाठी पतीने पत्नीला आणि मुलाला सॅनिटायझर पाजल्याची घटना समोर आली आहे़ नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पत्नीने धुळ्यात फिर्याद दिली असून नाशिकला गुन्हा दाखल होणार आहे़याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथे सातपूरच्या अशोक नगरात नागरे चौकातील राजा अपार्टमेंटमध्ये रोहाऊस क्रमांक पाचमध्ये ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता आणि सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली़ दिपा रावसाहेब राऊळ (वय ४०, हल्ली मुक्काम प्लॉट क्रमांक १६ अ, योगिता सोसायटी नकाने रोड, देवपूर धुळे, कायमचा पत्ता राजा अपार्टमेंट, सातपूर, नाशिक) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घर सोडून जावे यासाठी तिचा पती रावसाहेब सुभानसिंग राऊळ याने मारहाण, शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ शारिरीक आणि मानसिक छळ केला़ तसेच मुलगा दिव्येश आणि मला बळजबरीने सॅनिटायझर पाजून मुसळीने मारहाण करीत हाताला दुखापत केली़या घटनेनंतर सदर महिला धुळ्याला आली होती़ तिची मनस्थिती चांगली नसल्याने तिला पोलिसांत फिर्याद देण्यास विलंब झाला़ नातेवाईकांसोबत येवून तिने ४ जुलै रोजी फिर्याद दिली़ त्यानुसार सायंकाळी साडेसात वाजता पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तिचा पती रावसाहेब राऊळ याच्याविरुध्द भादंवि कलम ३२८, ३२६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हा गुन्हा नाशिक शहरात सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सदर गुन्हा सातपूर पोलिसांकडे वर्ग करण्याची तजविज ठेवली असल्याची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात दिली आहे़ या गुन्ह्याचा तपास देखील सातपूर पोलीस करणार आहेत़
घर सोडून जावे यासाठी पत्नीसह मुलाला पाजले सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:39 IST