शिवतीर्थापासून जवळ असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्राला लागून वनविभागाचे विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाच्या पाठीमागे चंदनाचे झाड लावले होते. अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येत कटरच्या मदतीने हे झाड कापून नेले. सुमारे ९ वर्षांपूर्वी हे चंदनाचे झाड लावण्यात आले होते. चोरीचा हा प्रकार १३ जानेवारीला सकाळी ९ ते १४ जानेवारीला सकाळी नऊ या वेळेत घडला. चोरट्यांनी कापून नेलेला चंदनाचा वृक्ष सुमारे ३६ सेंटिमीटरचा होता. या झाडाची किंमत सुमारे २२०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे.
याप्रकरणी वनपाल चेतन शंकर काळे (वरा. २८ अ, धनदाईनगर, वलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास हेड कॅान्स्टेबल राठोड करीत आहेत.
दरम्यान, शहरात चोरीचे सत्र सुरू असताना आता चोरांनी झाडांनाही लक्ष्य केले आहे. दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या बंगल्यात हातसफाई केली होती. तर आता शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच कटरने झाड तोडून नेण्याची हिंमत चोरट्याने केली आहे. एकप्रकारे चोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, कटरने झाड तोडून नेईपर्यंत कुणाला आवाज कसा आला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.